moden pan vaknar nahi marathi book review cover

मोडेन पण वाकणार नाही

पोस्ट शेयर करा:

लेखक – वपु काळे

समीक्षण – नेहा गावडे

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठ संख्या – ११२ 

मूल्यांकन – ४.८ | ५

मराठी साहित्यसृष्टीतलं एक महत्वाचं लेखक प्रस्थ म्हणजे लेखक व. पु. काळे. मराठी वाचकांच्या मनावर वपुंच्या लेखणीने,त्यांच्या पुस्तकांनी अक्षरशः गारूड घातलेलं आहे. त्यामुळे ‘मोडेन पण वाकणार नाही’ जेव्हा वाचायला घेतलं तेव्हा ज्ञानात आणि अनुभवात भर घालणार सुंदर आणि अजोड असं काही तरी वाचायला मिळणार यात शंका नव्हतीच आणि पुस्तक वाचताना या वाचकांच्या अपेक्षेेचा कुठेच भंग होत नाही हे मी इथे नमूद करू इच्छिते.

‘मोडेन पण वाकणार नाही’ हा आठ कथांचा कथासंग्रह आहे. वपुंच्याच शब्दात सांगायचं झालं तर आठ वेगवेगळ्या ‘पॅटर्न’ च्या व्यक्तींशी आपली या कथासंग्रहात गाठ पडते. या आठ व्यक्तीचं वागणं,त्यांचे विचार हे जरी त्यांच्या परिस्थितीला अनुसरून आणि वेगवेगळे असले तरी आयुष्याच्या कुठल्याही वळणावर समोर आलेल्या व्यक्तीजवळ, उभ्या ठाकलेल्या परिस्थितीसमोर न वाकण्याची आणि ठामपणे , स्वाभिमान राखून उभं राहण्याची एक समान वृत्ती या आठही प्रमुख व्यक्तिरेखांमध्ये दिसून येते आणि यातूनच पुस्तकाचं शीर्षक किती सार्थ आहे याची प्रचीती एक वाचक म्हणून येऊन जाते.

एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून पाहताना यातल्या काही पात्रांचं वागणं,त्यांचे विचार अवाजवी वाटू शकतात पण त्या पात्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या पात्राच्या स्वभावाला धरून ते वागणं आहे याची जाणीव होते. त्यामुळे कथेच्या सुरूवातीपासून शेवटापर्यंत व्यक्तिरेखांच्या विचारात आणि स्वभावात कुठेच विसंगती आढळून येत नाही. वपुंनी रंगवलेल्या या आठ व्यक्तिरेखा कधी स्वतःची तत्वं जपण्यासाठी तर कधी स्वतःच्या किंवा जवळच्या माणसांच्या स्वाभिमानाची,इभ्रतीची जपणूक करण्यासाठी कोणासमोर कधी शरण गेल्या नाहीत. प्रत्येक कथेतल्या स्वाभिमानासाठीच्या लढ्यात सर्वस्व गमावून नामशेष होण्याची वेळ येऊन सुद्धा या व्यक्तींनी त्यांच्या वागण्यातून ‘मोडेन पण वाकणार नाही’ या उक्तीला शब्दशः सार्थ ठरवले आहे.

एकशे बारा पानं आणि आठ कथा यांमुळे हा कथासंग्रह वाचून लवकर संपू शकतो परंतु या आठ कथांमधील वेगवेगळी पात्रं,त्यांचा जीवनाकडे,वाट्याला आलेल्या परिस्थिती कडे पाहण्याचा दृष्टिकोन वाचकाच्या मनावर जबरदस्त परिणाम करतात, वाचकाला अंतर्मुख करून जातात आणि म्हणूनच दीर्घकाळ स्मरणात राहण्याचं सामर्थ्य या कथांमध्ये आहे. कठिणातल्या कठीण परिस्थितीला प्रबळ स्वाभिमानाच्या जोरावर तोंड देण्याची प्रेरणा हा कथासंग्रह देतोच परंतु त्याचसोबत प्रसंगी अवाजवी स्वाभिमानाच्या भोगाव्या लागणाऱ्या किमतीची कल्पना सुद्धा देऊन जातो.

समीक्षण – नेहा गावडे

moden pan vaknar nahi v pu kale vasant purushottam neha gavde mehta


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/2886/moden-pan-waknar-nahi—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *