लेखक – मुंशी प्रेमचंद
पृष्ठसंख्या – ३९२
मूल्यांकन – ४.५
भारतातील सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे अनेक आहेत, पण मुंशी प्रेमचंद यांच्या ‘गोदान’ ची सर त्यातील कशालाच नाही. तसे शेतकऱ्याच्या परिस्थितीवर लिखाण करून अनेक लेखक लोकप्रिय झाले, पण त्यांची खरी मार्मिक अवस्था जाणून लिहिणारे प्रेमचंद हे एकच म्हणावे लागतील. हे पुस्तक प्रेमचंद यांनी इतक्या मार्मिक बरकाव्यानिशी लिहिले आहे, की प्रत्येक पानावर आपला जीव तीळ तीळ तुटतो. यांच्या या लिखाणाने एका समाजाच्या ग्रासलेल्या आणि दुर्लक्षित भागाला, योग्य तो न्याय मिळाला आहे.
प्रेमचंद यांनी हिंदी साहित्याला खूप अनमोल भेटी दिल्या आहेत. त्यातील ‘गोदान’, ‘गबन’, ‘निर्मला’ यांची जागा अढळ आहे. त्यांच्या लेखणीने भारतीय युवक, शेतकरी, महिला यांच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. भारतीय ग्रामीण समाज त्यांनी अनेक पुस्तकातून विविध अंगाने टिपला आहे. इंग्रजी साहित्या मध्ये शेक्सपियर यांचं नाव ज्या आदराने घेतलं, तितकंच प्रेमचंद हे नाव हिंदीत.
गोदान या पुस्तकद्वारे प्रेमचंद त्यांनी होरी नावाच्या एका गरीब शेतकऱ्याची कथा मांडली आहे. कथा वाचत असताना शेतकऱ्यां प्रति एक वेगळीच उर्मी दाटून येते. ” हमें कोई दो नों जून खाने कों दे, तो हम आठो पहर भगवान का जाप ही करते रहे !” या वाक्यावरून होरी ची परिस्थिती आपल्याला समजते. होरीच्या आधारे एका दयनीय शेतकऱ्याचं प्रतीक त्यांनी उभारल आहे. मेहनत करण्याची जिद्द आणि प्रामाणिकपणा ही त्याची संपत्ती. होरी जरी गरीब असला तरी त्याची स्वप्ने मात्र होती. हिंदू धर्मात गाईचे महत्व काय आहे हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. पापभीरू असलेला होरी याचं एकच स्वप्न आहे ते म्हणजे गोदान करणे. “एक बार गोदान कर दो तो गंगा नहा लू” अस काहीस त्याच मत होत. गाय एखाद्या मंदिराला किंवा ब्राह्मणाला दान म्हणून दिल्याने आपली सर्व पापे नष्ट होतील असा होरीचा भोळाभाबडा विश्वास असतो. उत्तर भारतीय समाजात ही प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे.
होरिने काढलेले कर्ज… त्यातून घरी आलेली देखणी गाय… विषप्रयोग… पुन्हा काढावे लागलेले कर्ज… कौटुंबिक खळबळ… यातूनच अनेक प्रश्न भेडसावत राहतात. यात त्याच्या बायकोचं असणारे सहकार्य विशेष.
“स्त्री पृथ्वी की भाँति धैर्यवान् है, शांति-संपन्न है, सहिष्णु है। पुरुष में नारी के गुण आ जाते हैं, तो वह महात्मा बन जाता है। नारी में पुरुष के गुण आ जाते हैं तो वह कुलटा हो जाती है।”
अशा अनेक सहज आणि सुंदर वाक्यांमध्ये प्रेमचंद यांनी स्त्रियां बद्दलचे आपले मत व्यक्त केले आहे. कथा जशी जशी शेवटा कडे झुकते तशी होरी बद्दलची तगमग आणखीनच वाढत जाते.
होरी, धनिया, गोबर, भोला, झुलिया ही सगळी जण भारतातील प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाची कहाणी सांगतात. कथा स्वातंत्र्योत्तर काळातली असली तरी, अजून ग्रामीण भारताची छबी आपण त्यात पाहू शकतो. ‘विदर्भातील शेतकरी आत्महत्या’ अशा सामाजिक प्रश्नाचं गूढ लक्षात यायला लागतं. मराठी, इंग्रजी या भाषांमध्ये जरी हे पुस्तक मिळत असलं, तरी मला असं वाटतं की हे पुस्तक हिंदीतच वाचावं. कारण प्रेमचंद यांच्या लिखाणाचा गाभा हिंदीत आहे. गोदान या कादंबरीला प्रेमचंद यांचा ‘मास्टर पीस’ असे म्हटले जाते. आणि ते का हे जर जाणून घ्यायला मन गंभीर करून करून वाचायला घ्या, मुंशी प्रेमचंद यांचं गोदान.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
हिंदी आवृत्ती
संबंधित व्हिडिओ