लेखक- पाउलो कोएलो
पृष्ठसंख्या: ४००
मूल्यांकन ४.१ | ५
‘कान्स फिल्म फेस्टिवल’ या नावाने जगभरातील फिल्मी दुनियेतील सर्व लोकांचे कान उंचावतात. फॅशन विश्वातील झगमगाट, पैसा, प्रसिद्धी, आणि त्यात जगणारा सुपर क्लास, या बद्दलचे कुतूहल प्रत्येकालाच असते. परंतु पडद्यामागे काय काय घडत असतं याची आपल्याला भनक सुद्धा नसते. आणि तेच नेमकं आपल्याला या पुस्तकद्वारे सांगण्याच्या प्रयत्न केला आहे. हे समजून घेताना एक विलक्षण आतुरता मनात दाटते.
‘अ विनर स्टँड्स अलोन’ या पुस्तकात पाउलो कोएलो यांनी इगोर नावाच्या तरुणाची कथा मांडली आहे. बीलिनियर असणाऱ्या इगोर कडे कशाचीच कमतरता नसते. परंतु तो एकच गोष्टीने झपाटलेला असतो आणि ती म्हणजे ‘ईवा’. ईवा ही इगोर ची बायको, परंतु हमीद नावाच्या जगप्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या ती प्रेमात पडली असते. तिला परत मिळवण्याच्या प्रयत्नात इगोर कान्स मध्ये पोहोचतो. आणि इथून पुढे सुरुवात होते एका चित्तथरारक नाट्याची. ईवाला परत मिळवण्यासाठी इगोर कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार होतो. सर्व सुखे पायाशी लोळण घेत असताना ईवाने इगोरला का सोडावे ?? हा प्रश्न जसा सतत मनाला भेडसावत असतो तसाच… इगोर फक्त निखळ प्रेमापोटी हे सर्व काही करतोय का ?? अशीही मनाला एक शंका वाटत राहते. या गोष्टींचा विचार केल्याशिवाय कथा पुढे जात नाही.
या दोघांबरोबरच, मुख्य भूमिका मिळावी म्हणून झटणारी अमेरिकन अभिनेत्री गॅब्रिएला, सुप्रसिद्ध परंतु करिअरला घरघर लागलेली मॉडेल जास्मिन, डिटेक्टिव्ह सावोय आणि फॅशन जगतातील सेंन्सेशन हमीद यांची कथा आपल्याला इथे समजते. या सर्व जणांचे जीवन एकमेकांबरोबर कशाप्रकारे गुरफटले गेले आहे, हे पाउलो यांनी खूप चांगल्या प्रकारे लिहले आहे. कान्स या शहराविषयी बरीचशी माहिती आपल्याला यातून आपण नव्याने शिकतो. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाण्यासाठी सर्व कलाकारांमध्ये इतकी चढाओढ का असते हे देखील स्पष्ट होते.
या पुस्तकातून पाउलो यांच्या लिखाणाची एक वेगळी शैली आपल्याला समजते. पाउलो यांच्या पुस्तकांतील मला आवडणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक कथा ही वेगळ्या देशात घडत राहते. ब्रिडा मध्ये आयर्लंड, द अल्केमिस्ट मध्ये स्पेन आणि इजिप्त, द विच ऑफ पोर्टोबेलो मध्ये रोमानिया, इलेव्हन मिनिट्स मध्ये ब्राझील आणि स्विझरलँड, वेरोनिका डिसाईड टू डाय मध्ये स्लोव्हेनिया या सर्व देशांची सफर केल्याचा भास होतो. यातून आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या माणसांचे जीवन जगल्यासारखं वाटतं. तिथला इतिहास समजतो. माणूस समजतो. पुस्तकाची अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे पाउलो यांच्या इतर पुस्तकांची कथा निसर्गाशी जास्त जवळीक साधणारी वाटतात पण ‘अ विनर स्टँड अलोन’ मध्ये शहरी झगमगाट दिसतो. पाउलो यांच्या इतर पुस्तकां सारखं नसलं तरी हे पुस्तक तितकच वाचनीय आहे. आयुष्यात एकमेव असं काहीच नसतं आयुष्य प्रत्येकाला सतत संधी देत राहतं असा संदेश ते आपल्याला देत. आणि त्यामुळेच ते आपल्या मनात घर करून राहतं, ही चित्तथरारक कथा वाचायला मजा येते.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या