amrutvel marathi book review cover

अमृतवेल

पोस्ट शेयर करा:

लेखक – वि. स. खांडेकर 

प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस 

पृष्ठसंख्या – १५२

मूल्यांकन – ५ | ५

मानवी जीवन हे जसं नियतीला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे तसं विश्वाच्या रंगभूमीवर नियतीच्याच तालावर नाच करणारी ती एक कठपुतळी नव्हे काय? स्वप्नांचे अनेक इमले रचावेत, येणाऱ्या शुभकाळाच्या चिंतनात अनेक आकांक्षा मनात बाळगाव्यात आणि क्षणाचाही विलंब न करता नियतीने आपल्या सामर्थ्याने त्या डावाचा चक्काचूर करावा असा अनुभव न आलेला एकही मनुष्य या भूतलावर अस्तित्वात असेल काय? या उधळलेल्या डावाने पिचून गेलेला मनुष्य नैराश्याच्या खोल गर्तेत अडकल्याशिवाय राहतो काय? नाहीच ना. मुळातच जीवन हा दासबाबू म्हणतात तसा बुद्धिबळाचा डाव असावा ज्यात काळ्या सोंगट्याही आपल्याच अन पांढऱ्याही आपल्याच! जिथे आपण जिंकतोही आपल्याविरुद्ध व हरतोही आपल्याचविरुद्ध! असा स्वतःविरुद्ध जिंकलेला माणूस मग नियतीच्या बेभरवशी खेळाला डगमगत नाही तो त्याला धैर्याने सामोरा जातो. मिळालेलं आयुष्य सत्कारणी लावत आयुष्यरूपी रोपट्याचा त्यातून महावृक्ष घडवतो. अशा लोकांसाठी वा अशा लोकांना समोर ठेवून लिहलेली “अमृतवेल” ही वि.स.खांडेकरांची कादंबरी जगण्याचं एक महान रहस्य आपल्याला सांगून जाते.

दादासाहेब नावाच्या एका स्वातंत्र्यसैनिकापासून सुरू होणारी ही कथा दासबाबू, नंदा, माई, वसू, मधुरा, बापू आणि देवदत्त या पात्रांची ओळख करवून वाचकाला हळूहळू आपल्या जाळ्यात ओढत जाते. एम.ए ला शिकणारी व शेखर सोबत लग्न ठरलेली नंदा, शेखरच्या अपघाती निधनाने सुन्न होऊन जाते. आपल्यासोबत घडलेल्या या घटनेचा तिच्या मनावर मोठा आघात होतो ज्यातुन ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते मात्र दादा, माई आणि मिलिंद (बहिणीचा मुलगा) यांची माया तिला मृत्यूपासून मागे खेचून आणते. आपल्या वडिलांना दादांना हा घडला प्रकार सांगून ती  त्यांची माफी मागते व आपला पी.एच.डी करण्याचा मानस बोलून दाखवते. हे सगळं घडत असताना दादांचा आणि तिचा घरातल्या घरात होणारा पत्रव्यवहार वाचनीय आहे. आकाशाचा थांग लागण्यासाठी पाखराला घरटं सोडावंच लागतं! तसं आपल्या मुलीने देखील बाहेर पडून जगाचे अनुभव घेतल्याशिवाय, तिथलं दुःख पाहिल्याशिवाय तिला आपलं दुःख विसरता येणार नाही असं मानणारे दादा तिला घराबाहेर पडायला सांगतात. दासबाबूंच्या मदतीने कॉलेज मधल्या आपल्याच मैत्रिणीची परंतु लग्न करून जहागिरदारीण बनलेल्या वसुंधरा गुप्तेची सोबती बनून नंदा तिच्यासोबत विलासपूरला दाखल होते. विलासपूर व जवळच असलेल्या चंदनगडच्या निसर्गरम्य सहवासात आपला काळ सुखात जाईल व आपलं दुःख विसरायला मदत होईल असं वाटणाऱ्या नंदाच्या आयुष्याचा व कथेचा दुसरा टप्पा इथेच सुरू होतो.

शिकारीचा शौक असणारा, शेक्सपिअरलाच मानवी आयुष्य खऱ्या अर्थाने कळालं असं मानणारा व आपल्याच दुःखात आकंठ बुडालेला भाईसाहेब तथा देवदत्त (वसुचा नवरा) तिला इथेच भेटतो. “देवदत्तला या जगात फक्त दोनच मित्र आहेत एक चंचल (शिकारीच्या वेळी त्यानेच अधू केलेली हरिणी) आणि दुसरा मृत्यू!” असं म्हणणाऱ्या भाईसाहेबांच्या मनाची अवस्था लेखक या एकाच वाक्यातून आपणाला करवून देतो. पुस्तकात रमणारा, मन शांत करण्यासाठी टिपणं लिहिणारा देवदत्त आणि नंदा यांच्या मैत्रीची कथा वाचण्यासारखी आहे. स्वतः त्या प्रसंगातून सावरलेली नंदा कशी देवदत्तला आत्महत्तेपासून परावृत्त करते व जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी त्याला मैत्रीण म्हणून कशी मदत करते हे जाणून घेण्यासाठी अमृतवेलच वाचायला हवी. कारण ज्या शब्दांत खांडेकरांनी ते विशाद केलं आहे ते जगाच्या पाठीवर दुसरा कोण करू शकेल असं मला तरी वाटत नाही. नंदा व देवदत्त यांमधील संभाषण हा पुस्तकाचा गाभा आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही. कारण आयुष्याच्या शापातून मुक्त होण्यासाठी आपल्याला किमान मृत्यूचा चोर दरवाजा तरी उघडा आहे मात्र आपली भळभळणारी जखम घेऊन जगभर फिरणाऱ्या अश्वत्थाम्याकडून नियतीने तो देखील हिरावून घेतला आहे. अशी संकल्पना मांडणारा देवदत्त शब्दांत मांडण हेच एक महादिव्य आहे. विलासपूरला नंदाला भेटलेले बापू पत्नीसाठी त्यांची चालू असलेली धडपड यातून वाचकाला व नंदाला प्रीती म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर हमखास मिळून जाते. लिहण्यासारखं खूप आहे मात्र जे पुस्तकात आहे ते शब्दबद्ध करणं खांडेकर समजून घेण्याइतकच अवघड आहे.

“जोपर्यंत वाचायला महाभारत आणि पाहायला कैलास लेणी आहेत तोपर्यंत जगण्यासारखं खूप काही आहे”. 

अदभूत!, कमाल!, क्या बात है!, वाहह! असे शब्द वाचकाच्या तोंडून नकळत उच्चरायला लावणारी अशी कितीतरी वाक्य, प्रसंग या पुस्तकात आहेत. वाचक म्हणून त्याचा आस्वाद घेताना मन सदैव अतृप्तच राहतं. आपल्या कित्येक बालप्रश्नांनी भंडावून सोडणारी मधुरा, प्रीतीच्या आलेल्या वेगळ्या अनुभवाने दुखावलेली वसू यांनी कथेला पूर्णत्वास नेले आहे.

माणूस नेहमीच आपल्या दुःखाला कवटाळून बसतो, भूतकाळाच्या साखळदंडांनी स्वतःला जखडून घेत असतो, कोणीतरी आपल्या दुःखाला समजून घ्यावं त्यावर फुंकर घालावी असं त्याला सतत वाटत राहतं. नियतीने त्याला भविष्याचे गरूडपंख दिले आहेत हे ही तो साफ विसरून जातो. अशावेळी त्याला गरज असते मायेची, प्रीतीची जी त्याला दुःखाच्या गर्तेतून बाहेर खेचून आणेल. अमृतवेल च्या या कथेतून अपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं हमखास मिळून जातात. त्यातील नंदा, देवदत्त, वसू आपल्या आजूबाजूला आपल्याला रोज दिसतात. त्यांनाही पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लेखक अमृतवेल मधून आपल्याला देऊन जातो. आपल्या वाचन संग्रहात असायलाच हवं असं हे पुस्तक सर्वप्रकारे उपयुक्त आहे. तत्वज्ञानाच भांडार असलेली ही वेल आणि त्यावर खांडेकरांनी रचलेली पुष्परूपी पात्र वाचकाच्या आयुष्याच्या वाटीकेमध्ये अखंड दरवळत राहतील यात तिळमात्र शंका नसावी!

vishnu sakharam khandekar vs girish kharabe mehta


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/2107/amrutvel—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]



पोस्ट शेयर करा:

About the author

गिरीश खराबे

View all posts

1 Comment

  • ❤अमृतवेल ❤️
    मी वाचलेल्या खांडेकरांचे हे दुसरे पुस्तक आहे. ‘अमृतवेल’ वाचताना माझ्यावर टाकलेल्या साहित्यिक समाधानाची आणि खळबळण्याची जादू तशीच राहिली. मराठी साहित्यातील हा विलक्षण सुंदर भाग आहे.
    मानवी भावनेच्या माझ्या छोट्या अनुभवातून ‘अमृतवेल’चे पुनरावलोकन करण्याचा विश्वासघात केल्यासारखे वाटते, परंतु आपण कोणत्याही कलाकृतीचा सादरीकरणाने तिचा मिनिटांचा तपशील जाणून घेतल्याशिवाय आणि “व्वा” उद्गार देऊन आनंद घ्या. मी माझ्या ‘अमृतवेल’ च्या वाहाला प्रतिकार करू शकत नाही. म्हणून, .काही शब्द या माणसाने आयुष्य अगदी जवळून पाहिले आहे. मानवी भावनांमध्ये सूक्ष्म बदलांचा अनुभव त्याने इतक्या चांगल्या प्रकारे घेतला आहे की, ‘नंदा’, ‘दादा’, ‘आई’ आणि ‘देवदत्त’ या तीन-चार वेगवेगळ्या दृष्टीकोनातून, पात्रांच्या जीवनात घडणाऱ्या समान दृश्याबद्दल जर आपल्याला खात्री वाटली तर. तो प्रेमाचा अर्थ विकसित करतो. हे बिनशर्त आहे, आम्ही वाचले आहे, कदाचित अनुभवलेही असेल. परंतु जेव्हा कधीकधी तो जोडीदाराच्या शारीरिक स्वरुपाची मागणी करतो, तेव्हा ते चुकीचे नाही, उलट हे या विश्वाचे मूळ आहे. जेव्हा ही मागणी नि: स्वार्थी आणि भावनांसह असते तेव्हा प्रेम सुरू होते.
    त्याने मानवी जीवनातील महत्त्वपूर्ण बिंदू स्पर्श केला आहे, आपण मृत्यू, भाग्य आणि सर्वांसमोर आयुष्यासमोर आपण किती दयनीय आणि असहाय आहोत. आयुष्यात अनेक ‘ड्रीम-नॉट-टू-सत्य’ क्षण येतात, जे स्वतः एक जीवन आहे. माणसाची महानता ही वस्तुस्थिती स्वीकारण्यात निहित आहे, हे घडत आहे हे पहा, त्यावर हसू द्या, ती पूर्ण करण्यासाठी धडपड करा, जर ती मुळीच खरी ठरली नाही तर त्यावरून चालत जा आणि नवीन स्वप्न विकसित करा. स्वतःचे आयुष्य घेणे हा कधीही तोडगा नसतो. माणूस कितीही कठीण, दयनीय आयुष्य असो, त्याच्याकडून निसर्ग, जगणे आवडते. तो आधी कितीही बलवान असला तरी त्याला प्रेमाचा आसरा पाहिजे. नवीन पुस्तके आणि छंदात स्वत: ला गुंतवून ठेवल्यामुळे अशा वेळी बचाव होणार नाही. मनुष्य विरोधाभासांनी परिपूर्ण आहे: त्याला आवडते, त्याचा द्वेष आहे; तो आदेश देतो, त्याचे पालन करतो, तो अगदी कठोर आहे, परंतु भावनिक देखील आहे; त्याच्याकडे विसरण्याची क्षमता आहे, परंतु ती बुद्धिजीवी आहे; तो आकाशात उडण्याचे स्वप्न पाहतो, परंतु पृथ्वीवरील त्याच्या घरट्यास भीती वाटते… प्रत्येकजण तसे आहे. त्याला फक्त अशा एखाद्याची गरज आहे जो त्याला त्याच्यासारखा समजतो. जेव्हा तो एखादी व्यक्ती सापडतो, तेव्हा तो पुन्हा जगू लागतो… एखाद्याला त्याच्या शूजमध्ये येणे समजून घेणे म्हणजे आपल्याला जे काही करायचे आहे ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *