लेखक- बाबा पद्मनजी
समीक्षण – मनाली घरत
पृष्ठ संख्या – १६०
बाबा पद्मनजी लिखीत यमुनापर्यटन ही १८५६ साली प्रकाशित झालेली मराठीतील पहिली कादंबरी आहे. या संपूर्ण कादंबरीमध्ये हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे वर्णन केलेले दिसून येते. १८५६ साली विधवा पुनर्विवाह कायदा लागू झाल्यानंतर सुधारणावाद्यांच्या प्रयत्नांमुळे विधवा पुनर्विवाहास भारतात थोड्या प्रमाणात का होईना सुरुवात झाली. त्यापूर्वी आणि १८५६ नंतरचाही बराच काळ हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी परंपरांच्या जाचाखाली गेल्याचे दिसते.
यमुनापर्यटन या कादंबरीमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार केलेला दिसत असला तरी विधवांच्या वाट्याला येणाऱ्या दुःखाचा आढावा यात घेतलेला दिसून येतो. काही प्रकरणांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेली ही कादंबरी यमुनाबाई व विनायकराव या दाम्पत्यांच्या सांसारिक प्रवासातून, वेगवेगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून आपल्यासमोर त्याकाळच्या विधवा स्त्रियांच्या जीवनप्रवासाचे चित्रण बाबा पद्मनजी यांनी केलेले आहे. सतीची चाल, बालविवाह, केशवपन यांसारख्या अनिष्ट रूढी परंपरांना स्त्रियांना कायम सामोरे जावे लागले. पतीच्या अकाली निधनानंतर खेळण्याच्या वयात स्त्रियांना आलेले वैधव्य आणि त्यात वैधव्यानंतर स्त्रियांची होणारी अवहेलना यांचे चित्रण या कादंबरीत लेखकाने केलेले आहे.
स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांची वेळोवेळी केलेली गळचेपी आणि स्त्रियांच्या भावभावनांचा केलेला अव्हेर यातून दिसून येतो. स्त्रियांच्या खच्चीकरणाला बऱ्याच प्रमाणात स्त्रियाच कारणीभूत असतात हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
यमुनाबाई आणि विनायकराव हे या कादंबरीतील सुधारणावाद्यांमध्ये मोडणारे दाम्पत्य असून त्यांच्या संभाषणातून लेखकाने पुनर्विवाहासंबंधी मतमतांतरे मांडलेली आहेत. सरतेशेवटी विनायकरावांच्या मृत्यूनंतर यमुनाबाईंनाही तो जाच सहन करायला लागलेला असला तरी केशवपनाच्या अनिष्ट रूढी ला बळी न पडता धैर्याने पुढे जाऊन यमुनाबाईंनी केलेला पुनर्विवाह म्हणजे एका नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे लेखकाने आपल्याला सुचवले आहे. अर्थात ही परिस्थिती सुधारण्या मागे अनेक सुधारणावाद्यांचा हातभार आहे यात काही वावगे नाही.
सध्याची परिस्थिती चार पटीने सुधारलेली असली तरीही बऱ्याच प्रमाणात अजूनही पतीचा मृत्यू झाल्यानंतर स्त्रियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या कादंबरीतील प्रसंग, घटना जरी सद्यस्थितीतील नसून १८५६ सालच्या असतील तरी आपण सद्यस्थितीची तुलना करून, आजचे प्रसंग लक्षात घेऊन या कादंबरी पासून बोध घेऊ शकतो यात काही वाद नाही.
समीक्षण – मनाली घरत
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ