लेखक – गिरीश कुबेर
पृष्ठसंख्या – ४१९
प्रकाशन – राजहंस प्रकाशन
मुल्यांकन – ४ | ५
टाटा हे नाव न ऐकलेली व्यक्ती कदाचित भारतात शोधून सापडणार नाही. भारतीयांसाठी विश्वास या शब्दासाठी समानार्थी टाटा हा शब्द आहे. आज टाटा समूह फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेला आहे. कित्येक क्षेत्रात टाटा समूह प्रथम क्रमांकावर आहे पण त्याबद्दल आपण सर्वच अनभिज्ञ आहोत.
लेखक गिरीश कुबेर यांनी टाटा समूहाच्या स्थापनेपासून ते अगदी अलीकडे रतन टाटा – सायरस मिस्त्री यांच्या पर्यंत या समूहाबद्दल लिहिलं आहे. हा कालखंड १०० वर्षांपेक्षा जास्त मोठा आहे. पुस्तकातील असंख्य घटना भारतातील आणि जगातील वेगवेगळ्या भागात घडलेल्या आहेत, पुस्तकात तत्कालीन व्यक्तिमत्वांची रेलचेल आहे, ब्रिटिश कालीन संदर्भ आहेत आणि स्वतंत्रोत्तर भारतातील राजकीय पार्श्वभूमी आहे. या पुस्तकाचा व्याप एकूणच प्रचंड आहे आणि तो गिरीश कुबेर यांनी समर्थपणे पेलला आहे आणि असं उत्कृष्ट पुस्तक मराठी भाषेत लिहिल्या बद्दल त्यांचे आपण कौतुक करायला हवं.
नुसेरवानजी टाटा (जमशेटजी टाटा यांचे वडील) यांनी मुंबई गाठली आणि कसलाही अनुभव अथवा अर्थसहाय्य पाठीशी नसताना व्यवसाय सुरु केला आणि टाटा समूहाचा पाया रचला. पुढे जमशेटजी टाटा ज्यांना आपण आज भारतीय उद्योगविश्वाचे भीष्म पितामह म्हणून ओळखतो त्यांनी या व्यवसायाचा विस्तार केला. जगात कोठेही जलविद्युत निर्मितीकेंद्र नसताना टाटा समूहाने तो अथक परिश्रमाने उभारला. टाटा समूहाच्या दूरदृष्टीनेच भारतात पोलाद उद्योग सुरु झाला. मुळात टाटा हे भविष्याचा विचार करत होते. देश बांधण्यासाठी सक्षम उद्योग उभे करणे गरजेचं आहे हे त्यांनी काळाच्या आधी ओळखलं आणि त्याची तयारी देखील केली.
पुस्तक वाचताना नावांमध्ये गफलत होऊ नये आणि समजण्यास सोपं म्हणून टाटांचा कौटुंबिक वृक्ष दिला आहे. उद्योगा व्यतिरिक्त टाटा कसे होते हे देखील लेखकाने जागोजागी विशद केलं आहे. पुस्तकात कोणी एक नायक नाहीये तरीपण ज्यांनी टाटा समूह पुढे नेला त्या सर्वांबद्दल लिहिलं गेलं आहे आणि प्रत्येकाला योग्य न्याय देण्यात आला आहे. पुस्तकात कृष्ण-धवल छायाचित्रेही देण्यात आली आहेत आणि शेवटी गिरीश कुबेर यांनी रतन टाटांची घेतलेली मुलाखत देखील आहे.
टाटा समूहाचा विस्तार होत असताना जेआरडी ना प्रचंड संघर्ष करावा लागला आणि त्याला कारणीभूत होत तत्कालीन राजकीय वर्तुळ आणि लायसेन्सराज. टाटा समूहाने खरी भरारी घेतली जेव्हा भारताने खुली अर्थव्यवस्था स्वीकारली आणि आज टाटा एक बलाढ्य उद्योगसमूह म्हणून नावारूपास आला आहे. पुस्तकात टाटा स्टील, एअर इंडिया, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टिंग सर्विसेस या कंपनींच्या जन्मकथा तर आहेत त्याशिवाय पहिली भारतीय बनावटीची मोटर अर्थात इंडिका आणि नॅनो ची जन्मकथा देखील आहे.
टाटायन हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने वाचावं असंच आहे. या उद्योगसमूहावर याहून सविस्तर माहिती असलेलं पुस्तक शोधून सापडणार नाही त्यामुळे हे पुस्तक एकदा जरूर वाचा.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
इंग्रजी आवृत्ती अमॅझॉनवरून विकत घ्या
किंडल आवृत्ती (इंग्रजी) विकत घ्या
संबंधित व्हिडिओ