लेखक – चंद्रकांत खोत
पृष्ठसंख्या – १५९
प्रकाशन – डिंपल पब्लिकेशन
मुल्यांकन – ३.७ | ५
गोरा रंग, रेखीव भुवया, डोळ्यांत सुरमा, पाणीदार डोळे, धारदार नाक, मेहंदी लावलेली भरघोस दाढी, डोक्यावर मौलाना टोपी आणि अंगात कडक इस्त्रीचे कपडे असा सत्तरच्या दशकातला बंडखोर आणि बिनधास्त समजला जाणारा एक लेखक अचानक कित्येक वर्षांसाठी (जवळ जवळ १४- १५ वर्ष) हिमालयात गायब होतो आणि विशेष म्हणजे ‘तिथून वापस येतो’ आणि येतो ते भगव्या कपड्यात आणि पांढऱ्या दाढीत! अशी जगण्याची पारंपरिक चौकट मोडणाऱ्या त्या लेखकाने साहित्याची पारंपरिक चौकट मोडली नसती तरच नवल होतं.
“जगात अश्लील असं काहीच नसतं म्हणजे श्लील असंही काही नसतं. असतं ते एक नग्न सत्य, जे पाहिल्यावर तुमच्या आत्म्याला झाकण्याचा प्रयत्न करता तुम्ही.” असं म्हणत आपल्या कादंबऱ्यांमधून सेक्स हा अन्न, वस्त्र, निवाऱ्या इतकाच रोजच्या जीवनातला असणारा आणि लागणारा विषय ‘चंद्रकांत खोतांनी’ सत्तरच्या दशकात अगदी निर्भिडपणे मांडला.
अर्थातच काळाच्यापुढे चालणाऱ्या माणसांसोबत जे होतं तेच त्यांच्यासोबतही झालं. ‘अश्लील साहित्य’ म्हणून त्याकाळी त्यांच्या साहित्यावर बंदी आणली गेली आणि खोतांचं ते बंदी आणलेलं साहित्य किंवा ती बंदी आणलेली कादंबरी म्हणजे ‘उभयान्वयी अव्यय’. पुरुष वेश्येवर (Male Prostitution) भाष्य करणारी ही कादंबरी. अर्थात आत्ता तुम्ही ही कादंबरी वाचलीत तर ‘ह्यात बंदी आणण्यासारखं किंवा आक्षेपार्ह काय होतं?’ असा प्रश्न तुम्हाला १००% पडेल ह्याची खात्री आहे. असो.
‘दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणारे अविकारी शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय’ असा शाळेत शिकलेला उभयान्वयी अव्ययाचा अर्थ ह्या कादंबरीत शोधताना वाटलं की एरवी कशाच प्रकारे एकमेकांशी साधर्म्य नसलेली चार माणसे त्या अविकारी नियतीमुळे एकत्र येतात आणि एकमेकांशी जोडली जातात आणि स्वतःच एकमेकांसाठी उभयान्वयी अव्यय होऊन जातात आणि कदाचित म्हणूनच ह्या कादंबरीचं हे नाव ठेवलं असावं.
प्रदीप (कादंबरीचा नायक), त्याची मानलेली बहीण शकुताई, त्याचा लहानपणीचा मित्र दिनकर आणि वेश्याव्यवसाय करणारी सलमा अशा ह्या चौघांना घेऊन मुंबईतल्या चाळजीवनाच्या पार्श्वभूमीवर ह्या पुस्तकाचं कथानक फिरतं.
तसं म्हटलं तर मला ही कादंबरी फारशी आवडली नाही. आवडली नाही ती तिच्या लिहीण्याचा पद्धतीमुळे. म्हणजे एकूण १५९ पानांच्या कादंबरीत पाहिले ५० पानं मला खोतांचा लिहीण्याचा पॅटर्न समजून घेण्यातच गेला. म्हणजे खोत एखद्या परिच्छेदात चाळीचं वर्णन करतात तर त्यापुढच्या परिच्छेदात एखादं पात्र बोलायला लागतं… ते पात्र काय सांगतय हे समजायच्या आत दुसरं पात्र दुसरं काहीतरी बोलायला लागतं. बऱ्याच ठिकाणी एखादा मुद्दा का लिहीलाय ह्याचा संबंध लागत नाही आणि वाचताना बऱ्यापैकी असंबंधता जाणवते थोडक्यात रिलॅक्स होऊन आपण हे पुस्तक वाचू शकत नाही. आता एवढं असूनही हे पुस्तक माझ्याकडून का वाचलं गेलं तर…
१. खोतांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मला असलेलं कुतूहल.
२. मुळात ७० च्या काळात जेव्हा सेक्स ह्या विषयाबाबत बोलण्यापेक्षा ते लपवण्यात मोठेपणा मानला जायचा अशा काळात एखादा माणूस सेक्स विषयी लिहायचं कशा प्रकारे धाडस करतो आणि त्याचं मत कसं मांडतो ह्याची उत्सुकता.
३. आज आपण एकविसाव्या शतकात असूनही आजही समलैंगिकतेचा विचार समजून घेणं आणि तो मान्य करणं आपल्याला अवघड जातं पण खोतांच्या प्रत्येक कादंबरीत त्यांनी समलैंगिकतेवर भाष्य केलं आहे असं मी वाचलं होतं त्यामुळे ते जाणून घ्यायची इच्छा.
४. अजूनही पुरुष वेश्या (Male Prostitution) ही संकल्पना आपल्या सारख्या सामान्यांना झेपत नाही. म्हणजे स्त्री दुबळी, तिच्यावरच्या अत्याचार इत्यादींमुळे तिला नाईलाजाने वेश्याव्यवसाय करावा लागतो हे एक वेळेस आपण समजून घेऊ शकतो पण मुळात पुरुषांवर वेश्याव्यवसाय करण्याची वेळ येतेच कशी? आर्थिक कारण सोडल्यास आणखीन काय कारणं असू शकतील? ह्याचा काही मागोवा घेता येईल का? असं म्हणून पण मझ्या कडून हे पुस्तक वाचलं गेलं.
खोतांचं मी वाचलेलं हे पहिलंच पुस्तक; आणखीन त्यांचं साहित्य मी वाचलेलं नाही त्यामुळे त्यांच्या लिखाणाविषयी (लिहिण्याची पद्धत) मी थोडी संभ्रमातच आहे. त्यात ह्या पुस्तकात ७० च्या दशकातले बरेचसे चाळीत वापरले जाणारे शब्द वापरले आहेत त्यामुळे ९० च्या दशकात जन्मलेल्या मला हे पुस्तक वाचताना तेसुद्धा जड गेलं.
हे पुस्तक वाचणं म्हणजे एकंदरीत सरासरी अनुभव होता. पण खोतांच्या गूढ व्यक्तिमत्त्वामुळे आणि काळाच्या पुढचे विषय मांडायच्या धडसामुळे नक्कीच त्यांचं आणखी साहित्य वाचायची इच्छा होते.
तुम्हाला एखादा नवीन लेखक एक्सप्लोर करायचा असेल तर आवर्जून हे पुस्तक वाचा बाकी सगळ्यांनाच खोतांचं लिखाण आवडेल, झेपेल किंवा पटेलच असं नाही.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: