fakira marathi book review cover

फकिरा

पोस्ट शेयर करा:

लेखक – अण्णा भाऊ साठे

समीक्षण – शैलेश भुतनर

पृष्ठसंख्या – १६८

प्रकाशन – सुरेश एजन्सी

मुल्यांकन – ४ | ५

आजपर्यंत आपण भरपूर चित्रपट किंवा नाटके पाहिली असतील, त्यापैकी बरेचसे चित्रपट किंवा नाटके आपल्याला खूप आवडलीही असतील. अभिनयाच्या जोरावर त्या चित्रपटातील किंवा नाटकातील एखादं पात्र कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहून जाते. ते पात्र तितके प्रभावी सादर होण्यासाठी अभिनेत्याच्या अभिनयाचा कस तर लागतोच; पण त्याचबरोबर दिग्दर्शक, लेखक, फोटोग्राफर यांची सुद्धा भरपूर मेहनत असतेच. पण जेंव्हा असाच अनुभव एखाद्या पुस्तकाच्या बाबतीत येत असतो, त्यातील प्रसंग आपल्या समोर घडत असल्याचा भास होतो, त्यातील घटना आपण पडद्याशिवाय पाहत असतो, तेवढ्या वेळासाठी का होईना त्या पुस्तकातील एखादे पात्र आपण जगत असतो, आणि पुस्तक वाचून झाल्यावरही काही वेळासाठी त्या पात्राचा हँगओव्हर आपल्या डोक्यात राहतो, हे सर्व त्याच पुस्तका सोबत घडत असते ज्यात लेखकाने आपली विचारशक्ती, आपलं सार लेखन कौशल्य पणाला लावून ते पुस्तक लिहिलेल असते. असा अनुभव फार कमी पुस्तकासोबत येत असतो. त्यापैकीच एक म्हणजे मराठी साहित्यात ‘मानाचे पान’ लाभलेली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची फकिरा ही कादंबरी. 

अण्णा भाऊ साठे यांच्या सिद्धहस्त लेखणीने साकार झालेली आणि  वि. स. खांडेकर यांची प्रस्तावना लाभलेली ही कादंबरी १९५९  साली प्रकाशित झाली. कधीही हार न मानणाऱ्या फकिरा या वीराची ही कहाणी अण्णा भाऊ साठे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे. वारणेच्या खोऱ्यातील बोलीभाषा, उत्कृष्ट वर्णनशैली, अप्रतिम कथाकथन, साहसप्रधान प्रसंग, काही ठिकाणी कथेला लागलेले काव्यात्मक वळण आणि कथेत मांडलेलं खरे खुर सामाजिक वास्तव याच्या जोरावर कलादृष्ट्या श्रेष्ठ ठरलेल्या या कादंबरीचा १९६१ साली महाराष्ट्र शासनाने ‘उत्कृष्ट कादंबरी’ हा पुरस्कार देऊन गौरव केला. भारतीय भाषांबरोबर रशियन, पाॅलीश, झेक, जर्मन, यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये देखील या कादंबरीचे अनुवाद झाले आहेत.

ही शौर्यकथा आहे वारणेच्या खोऱ्यातील आणि आसपासच्या परिसरातील अन्याया विरुद्ध चीड असलेल्या फकिरा या वीराची. प्रसंगी अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची कुवत बाळगणारा फकिरा हाच या कथेचा नायक आहे. वाटेगावच्या राणोजी मांगाच्या मनात शेजारील शिगावातील जोगणी आपल्या गावात आणण्याची इच्छा होते. दुसऱ्या दिवशी शिगावात जोगणीची जत्रा भरलेली असते. त्या दिवशी हा योध्दा एकटा जाऊन शिगावकरांसोबत झगडा करून ती जोगणी पळवतो आणि जत्रेमधुन परत येताना आपल्या दोन लहान मुलांसाठी म्हणजेच फकिरा आणि सहदेव साठी पेढा आणायला तो विसरत नाही. पण जोगणी घेऊन परत येताना शिगावची वेस ओलांडून वाटेगावच्या वेसेच्या आत आल्यावर देखील राणु मांग विरोधकांकडून म्हणजेच शिगावच्या खोतांकडून अन्यायाने मारला जातो. गावात जोगणी आणून गावाची प्रतिष्ठा वाढल्यामुळे सारा गाव राणोजीच्या कुटुंबाप्रती आदर आणि राणोजी साठी हळहळ व्यक्त करीत असतो. गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, पाटील, विष्णूपंत कुलकर्णी यांच्याकडून राणोजीच्या परिवाराला सहानुभूती मिळत असते. आपल्या पित्याची शौर्यगाथा मनात ठेवून फकिरा हा लहानाचा मोठा होत असतो. आपल्या वडिलांने गावासाठी जिवाचे बलिदान दिले आणि अशा या थोर पित्याचे नाव राखण्याचं काम आपल्याला बजावायचं आहे असं लहानपणापासूनच फकिराच्या मनात बिंबलेलं असते. 

पुढे विविध घटना घडत जातात. शिगाव आणि वाटेगाव या दोन गावात जोगणी मुळे आलेल्या शत्रुत्वामध्ये इंग्रज सरकार हस्तक्षेप करते आणि मग हे वैमनस्य इंग्रज सरकार आणि मांग महार यांच्यात सुरू होते आणि पुढे ते वाढत जाते. गावात साथीचा आजार येतो आणि तो कमी की काय म्हणून त्याच वर्षी गावात दुष्काळ पडतो. पुढे आड मागे आड मागे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मांगवाड्यातील लोकांना मरण्याखेरीज दुसरा पर्याय दिसत नाही. महामारी आणि दुष्काळामुळे भरडून निघालेल्या मांगवाड्याचे दुःख फकिराला पाहवत नाही. त्यामुळे फकिरा त्याच्या काही साथीदारांना सोबत घेऊन शेजारच्या गावातील धान्य लुटून आणुन मांगवाड्यात वाटतो. नंतर याच कारणामुळे पाटील आणि फकिरा यांच्यामध्ये वाद निर्माण होतो. लुटीच्या बदल्यात शिक्षा म्हणून फकिराला आणि त्याच्या साथीदाराला पाटलाकडे हजरी द्यावी लागायची. काहीही चूक नसताना मिळणारी ती अत्यंत अपमानकारक वागणूक फकिराला सहन होत नाही. त्याच काळात फकिरा आणि त्याचे सहकारी सरकारी खजिना लुटतात. आता मात्र इंग्रज सरकार फकिराला पकडण्यासाठी आकाश पाताळ एक करते. एवढे सारे शर्थीचे प्रयत्न करून देखील फकिरा इंग्रजांच्या हाती लागत नाही. म्हणून इंग्रज सरकार मांगवाड्यातील बाया लेकरा सहीत साऱ्यांना माळावरील छावणीत ओलीस ठेवतात. गावात जोगणीची जत्रा भरावी म्हणून गावच्या प्रतिष्ठेसाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या राणोजी मांगाचा हा वीर पुत्र फकिरा आठ जणांचा जीव वाचवण्यासाठी दोनशे बाया लेकरांचे होणारे हाल बरोबर नाही म्हणून मांगवाड्याच्या संरक्षणासाठी आलेला हा पराभव मोठ्या दिलदारपणे स्वीकार करून स्वतःच इंग्रज सरकारपुढे हसतमुखाने हजर होतो. फकिराचा हा पराभव इंग्रजांच्या विजयापेक्षा वाचकाला अधिक सुंदर आणि आदरणीय वाटतो. यातुनच अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीची जादू दिसून येते. 

कथेतील बरेच प्रसंग चित्तथरारक आहेत. सरकारी खजिन्यावर दरोडा टाकताना पळ काढाणाऱ्या साथीदारांना उद्देशुन फकिराच्या तोंडून निघालेले हे उदगार, “पळताना येनारं मरान वंगाळ. असं नरकात जातंं मानूस! मरान साऱ्यांस्नीच येनार, सारंच मरनार; पर मरनात बी डावं-उजवं असतं.” फकिराच्या तोंडून निघालेले हे बोल आगीच्या रखरखत्या निखाऱ्यापेक्षा काही कमी नाहीत. पुस्तक वाचुन झाल्यावर मरणात ही डाव उजवं पाहणारा फकिरा खरचं खुप ग्रेट वाटायला लागतो. 

एकीकडे सर्व शक्तिशाली इंग्रजी शासन आणि विरोधात दोन वेळच्या भाकरीसाठी आयुष्याशी झगडा करणाऱ्या मांगमहाराचं नेतृत्व करणारा फकिरा. मुळात यांची ही लढाईच विषमतेवर आधारित आहे, त्यामुळे या लढतीत फकिराचा पराभव होईल हे आपल्याला आधीच कळून चुकते; पण गावच्या प्रतिष्ठेसाठी जीवाची पर्वा न करणारा राणोजी मांग, पोटच्या पोराचं मरण पाहून आता नेहमी नातवाच्या काळजीत राहणारी राहीबाई, फकिराची आई असुन देखील फकिराला घाबरणारी राधा, मांगाच्या घरांना काटेरी झुडूप लावणारा कथेचा खलनायक रावसाहेब पाटील, पांढरीचा आदेश पाळला पाहिजे म्हणून मरणाला सामोरे जाणारा सावळा मांग आणि काय बी करून तुम्ही जगलं पाहिजे म्हणणारे विष्णूपंत ही पात्रे पुस्तक पुर्ण करायला परावृत्त करीत असतात. 

शेवटी मला आवडलेला पुस्तकातील एक वाक्य, “हेही दिवस जातील. दिवस घर बांधून राहात नाहीत!” दुष्काळ आणि ‘तापसरी’ च्या महामारी मुळे हतबल झालेल्या फकिराला आणि महारवाड्याला निराशेच्या गर्दीतून बाहेर काढून आशेचा नविन किरण दाखवणारे विष्णुपंतांचे हे लाखमोलाचं वाक्य आजच्या परिस्थितीतही तंतोतंत लागू पडते. 

समीक्षण – शैलेश भुतनर

fakira aanna bhau sathe anna lokshahir shailesh bhutnar suresh


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/1657/fakira-anna-bhau-sathe-suresh-agency-buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]



पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *