kim book review in marathi cover

किम

पोस्ट शेयर करा:

लेखक – रूद्यार्द किपलिंग

पृष्ठसंख्या – २९६

मूल्यांकन – ४.१ | ५

रुद्यार्ड किपलींग यांना आपण ओळखतो ते म्हणजे त्यांच्या जंगल बुक ह्या जगप्रसिद्ध कादंबरीसाठी. किपलींग हे नाव इंग्रजी वाटत असलं तरी किपलींग हे मनाने भारतीय आहेत. त्यांचा जन्म मुंबई मधला. त्यामुळे जवळजवळ त्यांच्या सर्वच पुस्तकातून भारतीय संस्कृती आणि येथील परंपरांचे दर्शन होते. आपल्या मनावर इंग्रज वाईट होते हे जरी बिंबल असलं, तरीदेखील सगळेच इंग्रज वाईट नव्हते, आणि याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सर रुद्यार्ड किपलींग. नोबेल पारितोषिक विजेते किप्लिंग यांचा भारत म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. रुद्यार्ड किपलींग आणि रस्किन बॉन्ड यांनी त्यांच्या पुस्तकांतून भारतीय संस्कृतीचे जे वर्णन केले आहे त्याला तोड नाही. एखाद्या अस्सल भारतीय लेखकाने जितक्या तन्मयतेने भारताबद्दल लिहावं अगदी तसंच या लेखकांनी सुद्धा लिहिलं आहे. त्यांच्या पुस्तकातून आपल्याला त्यांचे भारताबद्दलचं प्रेम कळून येतं. परंतु किपलिंग यांना एका गोष्टीमुळे टीकेचे धनी व्हावं लागलं, ते म्हणजे जालियन वाला बाग हत्याकांड यात जनरल डायरललच्या कृत्यांना त्यांनी दिलेला पाठिंबा. अगदी इतकी गोष्ट सोडली तर किपलींग यांना जवळजवळ सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी वेळोवेळी नावाजले आहे.

किम ही कथा आहे एका आयरिश पालकांच्या पोटी जन्मलेल्या परंतु अनाथ मुलाची. ही कथा द्वितीय अफगाण युद्धानंतरच्या काळामध्ये घडते. स्वतःला भारतीय समजणारा किम आपण आयरिश आहोत हे विसरून जातो. त्याचं सगळं बालपण लाहोरच्या गल्ल्यांमध्ये गेलेलं असतं. अतिशय खोडकर आणि खट्याळ असणारा कीम इंग्रजांनी भारतातून कसं निघून जायला पाहिजे वगैरे बाता करत असतो. इतरांना कुणाला सुद्धा किम ‘फिरंगी’ आहे हे माहीत नसतं परंतु त्याच्या खिशामध्ये असणाऱ्या काही पेपर्स द्वारे एका इंग्रज अधिकार्‍याला त्याची ओळख समजते. मग किमला लखनऊ मधील एका बोर्डिंग शाळेमध्ये पाठवलं जातं. लाहोरच्या स्वच्छंद आणि स्वैर वातावरणात वाढलेल्या किमची अवस्था एखाद्या पिंजराबंद पक्ष्यासारखी होते. दरम्यान याच काळात कीमची भेट एका तिबेटीयन आत्मज्ञान प्राप्तिच्या शोधार्थ भारताचा प्रवास करणाऱ्या लामांशी होते आणि इथून पुढे कथा एक वेगळेच वळण घेते. लाहोरच्या गल्ल्यांमध्ये उड्या मारणाऱ्या एक खट्याळ पोरापासून ते एक दर्जेदार गुप्तहेर पर्यंतचा किमचा प्रवास हा अतिशय थक्क करणारा आहे.

या कादंबरीची अजून एक जमेची बाजू म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतातील लाहोर, लखनऊ, शिमला आणि इतर अनेक शहरांचं अतिशय सुंदर वर्णन. त्याकाळची भारतातीय संस्कृती आपल्याला पुस्तकात समजते. 

किपलींग यांच्या दोन जगप्रसिद्ध कादंबऱ्या एक म्हणजे ‘जंगल बुक’ आणि दुसरी म्हणजे ‘किम’. या दोन्ही कादंबऱ्या वाचताना मला स्वतःला त्यामध्ये एक साधर्म्य वाटलं ते म्हणजे दोन्ही कादंबऱ्या या  अनाथ मुलांच्या आहेत. मोगली असो किंवा किम असो, दोघेही स्वतःच्या संस्कृतीपेक्षा अगदी वेगळ्याच वातावरणात वाढले आहेत. दोन्ही कादंबऱ्यांतून किपलींग यांनी लहान मुलांचे भावविश्व खूप सुंदररित्या रेखाटले आहे आणि दोघांचाही प्रवास अगदी मोहवून टाकणारा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा त्यांना सर्वांत आवडलेले पुस्तक म्हणजे किम असं सांगितलं होतं. त्यामुळे जर एखाद्या दर्जेदार पुस्तकाच्या शोधात असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी पर्वणी ठरू शकतं.

kim rudyard kipling renuka salve


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]
पोस्ट शेयर करा:

About the author

रेणुका साळवे

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *