लेखक – अनंत तिबिले
समीक्षण – अलोप गुधाटे
पृष्ठसंख्या – ४४०
प्रकाशन – रिया पब्लिकेशन्स
मूल्यांकन – ४ | ५
महाभारत म्हणजे वर्षानुवर्षे, युगानुयुगे आपल्या आयुष्याला नेहमीच सलग्न अशी व्यासांची निर्मिती. महाभारत काल्पनिक का सत्यकथा स्वतंत्र चर्चेचा विषय. कित्येक वर्ष लोटली, कित्येक युगे लोटली तरी महाभारतातील प्रत्येक पात्र आपल्याला आपलंच आयुष्य वाटू लागतं. आपण त्याला आपल्यात पाहतो. आणि खरंच त्यातील प्रत्येक पात्र आजमितीला जगत आहोत असंच वाटायला लागतं. तसं पाहता आपण कोणत्याही पात्राला आपल्याशी सलग्न करून विचार केला तर प्रत्येक जण त्याच्या जागी बरोबरच आहे अशी आपली खात्री पटायला लागते आणि मानवी स्वभावांचं वैविध्य आश्चर्यचकित करून जातं.
असं असूनदेखील हे शिवधनुष्य पेलण्याचं काम अनंत तिबिले यांनी लीलया पार पडलं आहे आणि तेही धनुष्य न तुटू देता. कादंबरीतील पात्र छान प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आलं आहे. भिष्मांच्या बालपणातील काही दुर्घटना, सोशिक स्वभाव, सर्वांच्याच प्रेमापासून वंचित असूनदेखील न्याय आणि प्रेम यासाठी लढणारे हे भीष्म पितामह पाहून मन अस्थिर होतं. त्यांच्या हातून नकळत झालेल्या काही चुका किंवा कानाडोळा झालेल्या बाबी, महाभारताचा रूप कसं बदलून टाकतात हे या पुस्तकातून वाचायला मिळेल.
या कथेतून महाभारताचा संपूर्ण कालखंड लक्षात येतो. प्रत्येक पिढीच्या जडणघडणीत भीष्माचार्यांचं योगदान जाणवतं. सरतेशेवटी त्यांना आपल्या भावना बाजूला ठेऊन कौरवांच्या बाजूने लढावं लागतं. त्यातही त्यांच्या जीवाची झालेली घालमेल, त्यांचा पदोपदी झालेला हिरमोड वाचताना त्यांची असह्याता घर करून जाते. तरीही, कुरुकुलाच्या वाढीतलं त्यांचं योगदान सर्वश्रेष्ठ ठरतं. कितीही बिकट परिस्थितीला आपले आदर्श न सोडता तोंड देता येतं, याचं एक अप्रतिम उदाहरण म्हणजे भीष्माचार्य. भीष्म म्हणजे कुरुकुल संवर्धन आणि विस्तार यासाठी निरिच्छ भावनेनं आजन्म जगलेल एकमेव दीर्घायुषी व्यक्तिमत्व.
अनंत तिबिले यांनी पितामह या कादंबरीतून भीष्माचार्य या महान व्यक्तिमत्त्वाला आपल्या शब्दातून, रचनेतून न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय असं नक्कीच म्हणता येईल. अनंत तिबीले यांचं प्रसंगवर्णनातील कौशल्य इथे ठळक दिसून येतं. शब्दांची मांडणी आणि सुयोग्य शब्दप्रयोग हे या कादंबरीचं वैशिष्ट्य सांगता येईल. ही कादंबरी एखाद्या नवीन वाचकाला प्रेरणा देऊ शकेल याबद्दल जराही शंका वाटत नाही. भीष्माचार्यांच्या दृष्टिकनातून महाभारत अनुभवायचे असेल तर हे पुस्तक नक्की वाचा!
समीक्षण – अलोप गुधाटे
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
khup sundar ani marmik shabadhat vichar mandale
khup sundar ani marmik shabadhat vichar mandale ani ashay pan changala ahe