savitri-marathi-book-review-cover

सावित्री

पोस्ट शेयर करा:

लेखक – पु.शि.रेगे

समीक्षण – मनाली घरत

प्रकाशक – मौज प्रकाशन

पृष्ठसंख्या – १७७

मूल्यांकन – ४ | ५

रेगेंची सावित्री माझ्या आयुष्यात आली ती मी एस.वाय.बी.ए च्या वर्गात शिकत असताना. अभ्यासक्रमात असणारी सावित्री कधी माझ्या लिखाणाला कारण ठरली ते कळलच नाही. पु.शि. रेगे लिखित ‘सावित्री’ ही एक पत्रात्मक कादंबरी आहे. ३९ पत्रांचं हे संभाषण वाचताना आपण फक्त सावित्रीची पत्र वाचत आहोत याचं आपल्याला भानच राहत नाही.

पहिल्या पत्रापासून ते अगदी ३९ व्या पत्रापर्यंत रेगे आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देतात. आईविना आप्पांच्या सानिध्यात आणि राजम्माच्या गोष्टी ऐकत वाढलेली सावित्री एका निराळ्याच सावित्रीचं रूप घेऊन आपल्या पुढ्यात उभी राहते. पुराणकाळापासून आपल्या कथांमध्ये असणारी सावित्री, ज्योतिबांची सावित्री आणि ही रेगेंची सावित्री या तिघिंचंही

आपल्या आपल्या ठिकाणी वेगळं असं स्थान आहे. भिन्नभिन्न काळात जन्मलेल्या या तिघी तरीही एकमेकींशी संलग्नतेचं नातं ठेवून आपल्याला काहीतरी नवं शिकवून जाणाऱ्या.

“मोर हवा तर आपणच मोर व्हायचं 

जे जे हवं ते ते आपणच व्हायचं” (पत्र १)

हे सांगत आप्पांची आनंदभाविनी साऊ आपल्याला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहते. अर्थात तो परिपूर्णतेचा आनंद शेवटच्या पत्रापर्यंत जाताना आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. 

पत्रातून सावित्री ज्याच्याशी संवाद साधते; तिचा ‘तो’ स्पष्टपणे आपल्या समोर येत नसला किंवा ही पत्र केवळ सावित्रीने लिहिलेली असली तरी तिच्या बोलण्यातून, तिच्या स्पष्टीकरणातून प्रत्येक पत्रातून हळूहळू ‘तो’ आपल्यासमोर उलगडत जातो. यासाठी एकविसावं पत्र खास आहे कारण त्याने विचारलेल्या साठ सांभाळलेल्या प्रश्नांची पाच संगतवार उत्तरं यात सावित्रीने दिली आहेत.

“मला माझं मन समजून घ्यायचं आहे ते समजलं की तुमचंही समजेल” (पत्र १६)

असं म्हणणारी सावित्री मध्येच आपल्याला पेचात टाकते. यावेळी तो खरंच आहे की सावित्री फक्त त्याला आपल्यातच शोधण्याचा प्रयत्न करते या संभ्रमात आपण पडतो. पण पुढे पुढे सावित्रीच आपल्याला त्या पेचातून बाहेर काढत जाते.

बऱ्याचदा एक उच्चतम पातळीचं निस्वार्थी नातं आपल्याला अनुभवायचं असतं ते नातं रेगे आपल्याला या कादंबरीतून अनुभवायला देतात. अनेक प्रसंगातून सावित्रीच्या तोंडून रेगे आपल्याला वेळोवेळी सांगत राहतात, की जसं राधा कृष्ण होते आणि कृष्ण राधा होतो तसंच कधीतरी आपण आपण न राहता कोणीतरी दुसरंच होऊन जावं. त्यातून इतरांसाठी काय निष्पन्न होईल माहित नाही पण आपण स्वतःसाठी खूप काही नवं मिळवू शकतो.

“केवळ बदल याला महत्त्व नसतं, सगळंच बदलत असतं. त्यातून जी जाणीव प्रगत होत असते तिला माझ्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे.”  (पत्र ३४)

कलाकार, लेखक, कवी कलाकृती निर्माण करत असतो. ती कलाकृती, त्यातील पात्र ही त्याचीच आपत्य असतात. तोच त्यांच्या तोंडून आपले विचार, आपली मतं मांडत असतो. रेगे या त्यांच्या मानसकन्येच्या तोंडून आपल्याला आयुष्याचे अनेक रंगीबेरंगी पाठ पढवून जातात.

शेवटी सावित्रीचं काय झालं ? तो आला की नाही ? त्यांच्या गोष्टीचं पुढे काय झालं ? पत्रांचा काय ? हे असे एक ना अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात पण ते प्रश्न तसेच अधांतरी ठेवून आपण आपल्याला विसरून कधी रेगेंची सावित्री होऊन जातो ते आपल्यालाच कळत नाही.

समीक्षण – मनाली घरत

savitri rege p s mauj manali gharat


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/book/3306/savitri—buy-marathi-books-online-at-majesticreaders-“]


बुकगंगा वरून विकत घ्या

अक्षरधारा वरून विकत घ्या




पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *