लेखक – पद्माकर गोवईकर
समीक्षण – सौरभ नायकवडी
पृष्ठसंख्या – १५३
प्रकाशन – कॉन्टिनेन्टल प्रकाशन
मुल्यांकन – ४ | ५
१३ व्या शतकात सगळीकडेच कर्मकांडाचे स्तोम माजले होते, यज्ञ, होम, हवन या गोष्टीस प्राधान्य दिले जात होते, धर्माचे मुळ तत्वज्ञान कुठेतरी बाजुला पडत होते, आणि त्याच वेळी महाराष्ट्राच्या ह्या पावन भूमीत श्रावण कृष्ण अष्टमीला ‘संत ज्ञानेश्वर’ नावाच्या तेजोनिधीचा जन्म झाला. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थच दिला. या अलौकिक पुरुषोत्तमाचे चरित्र पद्माकर गोवईकर यांनी ‘मुंगी उडाली आकाशी’ या कादंबरीतून सगळ्यांसमोर मांडले आहे.
कथेची सुरुवात इंद्रायणी काठी वसलेल्या ‘आळंदी’ गावापासून होते. कादंबरीची ही सुरुवातच तुम्हाला कादंबरीच्या प्रेमात पाडते. कादंबरीतील भाषा जरी विद्याप्रचुर असली तरी तिला कारुण्याचा स्पर्श आहे. वाचताना कुठेही त्याची क्लिष्टता जाणवत नाही. बहुधा हेच कादंबरीच्या यशाचे रहस्य असावे. कथा वाचत असता प्रत्येक पात्र हे जिवंत वाटते, प्रत्येकाचे भावविश्व स्वतंत्र मांडले आहे. सुवासिन असुनही वैधव्याचे जीवन जगणारी पतिव्रता रुक्मिणी, संसारी पण विरक्त भाव असणारे विठ्ठलपंत, अतिशय ज्ञानी आणि धर्माचा मुळ सार अगदी कमी वयात जाणलेली निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता ही भावंडे, वडिलांच्या संन्यासाची शिक्षा त्यांच्या निष्पाप मुलांना होऊ नये यासाठी धडपडणारे बळवंतशास्त्री. कथेत काही पात्रे अगदी कमी वेळेसाठी जरी आली असली तरीही कथा वाचत असताना प्रत्येक पात्राचे स्वतंत्र अस्तित्व जाणवते हे मात्र खरे.
कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे स्थळवर्णन. संत ज्ञानेश्वरांची चरित्रगाथा असल्याने आळंदी, त्र्यंबकेश्वर, पैठण, नेवासे, पंढरपूर त्याचबरोबर अनेक तीर्थक्षेत्रांचा उल्लेख आला आहे. प्रत्येक ठिकाणचे वर्णन आपल्याला त्या त्या ठिकाणची विशेषता सांगून जाते. कथेत काव्यपंक्ती, अभंगवाणी तसेच चित्रमय वर्णन देखील असल्याने कादंबरी वाचताना कंटाळा येत नाही किंवा कथा निरस होत नाही.
हिंदु धर्माचे तत्वज्ञान, धर्मशास्त्र, भागवत धर्म तथा वारकरी संप्रदायाचा सार या सर्व बाबींचा ऊहापोह आपल्याला दिसून येईल, आणि त्यात होरपळणारे विठ्ठलपंत-रुक्मिणी हे दांपत्य लेखकाने अत्यंत हृदयद्रावक शब्दांमध्ये मांडले आहे. पुस्तकाचा शेवट हा शोकात्मक आहे. ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरातच बाकी भावंडांनी देखील आपापली यात्रा संपवली. एकूणच ही सर्वगुणसंपन्न कादंबरी वाचनीय बनते.
समीक्षण – सौरभ नायकवडी
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ