लेखक – डॅनियल डफो
पृष्ठसंख्या – २९६
प्रकाशक – फिंगरप्रिंट प्रकाशन
मूल्यांकन – ४ | ५
रॉबिन्सन क्रूसो ही १७१९ मध्ये लिहिली गेलेली कादंबरी. ह्याच दरम्यान युरोपात औद्योगिकरणाचे वारे नुकतेच वाहू लागले होते. या काळात जवळजवळ प्रत्येकालाच ‘आपणही काहीतरी करून दाखवावं ‘ असं वाटतं होतं. त्याला कथेचा नायक रोबिन्सन क्रुसो हा अपवाद कसा असेल?
आजवर रोबिन्सन क्रुसो हा इंग्लंडमधील अत्यंत सुखवस्तू पालकांच्या छत्रछायेत वाढलेला असतो. काही विशिष्ट लोकांच्या संपर्कात आल्यामुळे, आणि त्यांच्या प्रभावामुळे रोबिन्सन समुद्र सफरीसाठी निघण्यास सज्ज होतो. निश्चितच त्याचे पालक याला नकार देतात, परंतु तरीसुद्धा त्यांना न जुमानता क्रुसो समुद्रसफर पूर्ण करण्यासाठी जातोच. पहिल्या दोन वेळेस तो सफलही होतो.
धीरगंभीर शांत समुद्र त्याला अगदी जवळच्या सवंगड्या सारखा वाटू लागतो. समुद्रात दूरच दूर जाण्याची महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देत नाही. याच मुळे तो आपल्या तिसऱ्या समुद्र सफारी साठी निघतो. परंतु तिसर्या वेळेस भलतंच घडतं. समुद्राने चांगलाच रुद्रावतार धारण केलेला असतो, आणि त्यातच रोबिन्सन क्रुसो हा एका भयंकर वादळाच्या तडाख्यात सापडतो. आणि इथून पुढे कथा प्रत्येक पानागणिक जास्तच रोमांचक होत जाते. वादळाच्या तडाख्यात सर्व काही बरबाद होऊन जातं. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने रोबिन्सन क्रुसो मात्र एका अनभिज्ञ बेटावर जाऊन पडतो , तेही तब्बल 28 वर्षांसाठी.
माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे रोबिन्सन क्रुसो त्या बेटावर आयुष्य कसे काढतो? तिथे तो एकटाच असतो की अजून कोणी त्याला साथ देतं? कोणकोणत्या नवीन गोष्टी तो शिकतो? आपल्या पूर्वायुष्यात तो परत जाऊ शकेल की नाही? हे सगळेच प्रश्न वाचकाला राहतात. धाडस,संयम,भय या सगळ्यांचा संगम या कादंबरीत आहे. पहिल्यांदा प्रकाशित झाल्यानंतर अगदी तीनशे वर्षानंतर सुद्धा या पुस्तकाची वाचकांच्या मनावर असलेली पकड अगदी घट्ट आहे. रोबिन्सन क्रुसो चा प्रवास फार विस्मयकारक भासतो आणि पुस्तक वाचताना रोबिन्सन क्रुसो च्या जागी आपण असतो तर काय केलं असतं अशा काही गोष्टी मनात येत राहतात. त्यामुळेच रोबिन्सन क्रुसो चा विस्मयकारक आणि रंजीत जीवन प्रवास समजून घ्यायचा असेल तर रोबिन्सन क्रुसो नक्की वाचा.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ