tales-of-unstoppable-women-book-review-in-marathi-cover

टेल्स ऑफ अनस्टॉपेबल वूमन

पोस्ट शेयर करा:

लेखक – डॉ. उर्मी ठक्कर

पृष्ठसंख्या – ८३

प्रकाशन – लीटबर्ग

मुल्यांकन – ४ | ५

करिअर की घर? की दोन्ही? की फक्त घर? की फक्त करिअर? ह्यातला एखाद्या स्त्रीने कोणताही ऑप्शन निवडला आणि त्यावर कितीही सक्षमपणे ती खरी उतरली तरीही तिला कोणता ना कोणता टॅग लागलेलाच असतो… घरी राहीली तर; एवढं शिकून पण घरीच बसायचं होतं तर कशाला शिकली चाा टॅग! करिअर निवडलं तर; बाईच्या जातीला कुठेतरी थांबावंच लागतं आणि ते नाही थांबलं की डॉमिनेटींग स्त्रीचा किंवा थेट फेमिनिस्टचा टॅग… आणि दोन्ही निवडलं तर; तुझं लक्ष नाहीये किंवा तुला बॅलन्स करता येत नाहीयेचा टॅग! थोडक्यात काय तर एका स्त्रीच्या मनात अपराधी पणाची एक भावना सतत राहावी ह्याची सगळं जग स्वतःच्या आद्य कर्तव्याप्रमाणे काळजी घेत असतं. पण ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून आपल्याला नेमकं काय हवंय? हे शोधून, आपल्या वाट्याला नेमकं कोणती परिस्थिती आली आहे हे ओळखून, आपल्या सर्व कर्तव्यांची जाण ठेवून ज्या सामान्य स्त्रियांनी परिस्थितीला शरण न जाता स्वतःसाठी असे ठाम निर्णय घेतले आणि स्वतःच्या आयुष्याला एक नवीन वळण दिलं अशा वेगवेगळ्या सात शिरोजच्या (Sheroes) गोष्टी आपल्याला सांगणारं पुस्तक म्हणजे ‘Tales Of Unstoppable Women’.

मुळात पेश्याने डॉक्टर (MD Pathologist) असलेल्या आणि सध्या माईंडसेट कोच म्हणून कार्यरत असलेल्या लेखिका डॉ.ऊर्मी ठक्कर ह्यांचं हे पहिलंच पुस्तक. लोकांच्या आयुष्यात आपल्याला काहीतरी चांगला बदल घडवता यावा ह्या त्यांच्या आत्मिक ऊर्मीमुळे खरंतर त्यांनी हे पुस्तक लिहायचं ठरवलं आणि त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांना तो उद्देश साध्य करायला जमला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हे पुस्तक वाचून प्रत्येकाला; विशेषतः एखाद्या स्त्रीला तिचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जो एक पुष (धक्का) पाहिजे असतो तो ह्या पुस्तकातून नक्की मिळेल असं मला वाटतं. ह्या पुस्तकात लेखिकेने सात वेगवेगळ्या स्त्रियांचा त्यांचा खऱ्या आयुष्यातला संघर्ष गोष्ट स्वरूपात मांडला आहे.

दृष्ट लागण्या सारखा संसार सुरू असताना अचानक एका प्रसंगाने स्वतःच्या पायावर उभं असायला हवं ह्याची जाणीव होऊन वयाच्या ३८ व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी गोव्यामध्ये लहान मुलांसाठी किडझी शाळा सुरू करणारी वनिता, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या मनाचा कौल घेत आणि सतत आधीपेक्षा मोठं काहीतरी करायची कास धरत वेगवेगळे क्षेत्र अजमावून पाहणारी एक गायिका, RJ, एडिटर आणि असं बरंच काही असलेली प्रणिता, दहा वर्ष नवरा आणि त्याच्या घरच्या लोकांच्या प्रेमापोटी त्यांच्या मतांचा मान ठेवत फक्त चूल आणि मुल करणारी आणि नंतर अंकलेश्वरमध्ये भगवती अकॅडमी सुरू करणारी प्रीती, चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडून आयुष्य खराब करून घेणारी पण नंतर कौटुंबिक संकटांवर मात करत, स्वतःचं मुल दूर व्हायचं दुःखं पचवत एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट बनणारी खुशी, ऐन लग्नाच्या आधी आपले पाय गमावलेली आणि नंतर पॅरा ओॅलिंपिक मध्ये गोल्ड मेडल मिळवणारी आणि स्वतःचं व्यावसायिक बनण्याचं स्वप्न पूर्ण करत एशिया स्पा मॅगझिनचा ‘Most Inspiring Person In The Beauty And Wellness Industry’ असा अवॉर्ड मिळवणारी भारती, नवऱ्यासोबत आपलं बिझनेस करायचं स्वप्न पूर्ण करणारी पण डिव्होर्स नंतर आई वडिलांनीही त्यांच्या घरात राहायला परवानगी न दिल्यामुळे पुन्हा शून्यापासून सुरुवात करून एक यशस्वी बिझनेसवुमन म्हणून स्वतःला घडवणारी व आई वडिलांची आणि स्वतःच्या मुलाची सक्षमपणे जबाबदारी घेणारी प्रज्ञा, आणि लोकांना चांगलं वाटेल तसं वागत स्वतःच्या स्वप्नांना मारून डिप्रेशन मध्ये जाणारी पण नंतर त्याच डिप्रेशन मधून बाहेर येऊन हजारो लोकांचे आयुष्य बदलून टाकणारी एक यशस्वी वक्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारी स्मिता आपल्याला ह्या पुस्तकातून भेटतात. 

प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात किंवा असा काही काळ येतो जेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट नको वाटायला लागते. आपल्याच वाट्याला असं का? म्हणून प्रत्येकाला आयुष्यात कायमची थांबायची इच्छा व्हायला लागते; पण अशा क्षणी न थांबता, कठीण असलं तरी जे लोक चालत राहतात तेच खरे हिरो ठरतात आणि मग त्यांना थांबवणं कोणालाच शक्य होत नाही. ते खऱ्या अर्थाने तेव्हा Unstoppable असतात. असंच आपल्यालाही Unstoppable बनता यावं ह्यासाठी पुस्तकाच्या शेवटी लेखिकेने 5 Ways to Become Unstoppable सांगितले आहेत. तसेच प्रत्येक गोष्टीनंतर आपल्याला 3 प्रश्नही विचारले आहेत जे आपल्याला Unstoppable होण्यासाठी आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी मदत करतात.

थोडक्यात फक्त ८३ पानांचं, पटकन वाचून होणारं, एका नव्या लेखिकेचं ताजं ताजं पुस्तक जर तुम्हाला वाचायचं असेल आणि खरंच आयुष्यात ‘ते एक निर्णायक पाऊल’ उचलण्यासाठी खरी मदत हवी असेल तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी एक मार्गदर्शक मित्र ठरू शकतं. तेव्हा हे पुस्तक नक्की वाचा आणि तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं ते लेखिकेला जरूर कळवा.

urmi thakker pranjali kulkarni tales of unstoppable women litburg


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:


[maxbutton id=”4″ url=”https://www.majesticreaders.com/”]पोस्ट शेयर करा:

About the author

प्रांजली कुलकर्णी

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *