लेखक – जॉन क्राकावर
समीक्षण – नितिश पारकर
पृष्ठसंख्या – ३६८
प्रकाशन – अँकर बुक्स
मूल्यांकन – ४ | ५
अ पर्सनल अकाउंट ऑफ द माऊंट एवरेस्ट डिझास्टर
हिमालय; जगातील अत्युच्य उंचीची अनेक शिखरे असलेली आणि “रूफ ऑफ द वर्ल्ड” असे जिला संबोधले जाते अशी जगप्रसिद्ध पर्वतरांग. त्यातीलच सर्वात उंच शिखर म्हणजे एव्हरेस्ट. जेव्हापासून एव्हरेस्टला सर्वात उंच शिखराचा दर्जा मिळाला तेव्हापासून ते गिर्यारोहकांना कायमच खुणावत आलं आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुमारास गिर्यारोहकांचे अनेक समूह एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करत असतात. असंच १९९६ सालच्या हंगामात एक वादळ निमित्त झालं आणि अनेकांची आयुष्यं कायमची बदलून गेली. ‘Into Thin Air’ ही त्याचीच कहाणी.
या पुस्तकाचा लेखक; जॉन क्राकावर हा एक अनुभवी गिर्यारोहक आणि पत्रकार. त्या साली तो स्वतः एका एव्हरेस्ट मोहिमेचा सहभागी होता. त्यामुळे मोहिमेच्या अगदी सुरुवातीपासून ते मोहिमेनंतरच्या अनेक घडामोडींविषयी या पुस्तकात सविस्तर माहिती मिळते. क्राकावर यांची गोष्ट सांगण्याची हातोटी उत्तम आहे. त्या हंगामातील घटनांची अतिशय सुसंबद्ध आणि खिळवून ठेवणारी अशी मांडणी त्यानी केली आहे. अधूनमधून अलंकारिक भाषेचा वापर केला आहे जी थोडी जड वाटते, पण बहुतांश पुस्तक तसं समजण्यासाठी सोपं आहे.
अर्थातच या पुस्तकातील घटनांचे वर्णन हे लेखकाच्या दृष्टिकोनातून आहे. त्याविषयी अनेक मतांतरे ही आहेत. १९९६ सालच्या एव्हरेस्ट मोहीमांतील अनेकांनी पुस्तकं लिहिली आहेत. प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातून घटनाक्रम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्वांत हे पुस्तक व्यापक आणि वाचकांच्या खास आवडीचं मानलं जातं.
मला एव्हरेस्ट बद्दल आणि ते सर करण्याच्या मोहिमांबद्दल लहानपणापासून बरंच कुतूहल होतं. १९९६ च्या हंगामाविषयी वाचल्यानंतर त्याविषयी अधिक जाणून घ्यायची उत्सुकताही होती. त्यामुळे हे पुस्तक वाचायला घेतलं. हे पुस्तक वाचण्याआधी एवरेस्ट सर करणं म्हणजे अतिशय खडतर काम आणि फक्त अनुभवी गिर्यारोहक ते सर करतात अशीही काहीशी समजूत होती. वास्तव याहून बरंच वेगळं आहे याची जाणीव हे पुस्तक वाचून झाली. हिमालयातील गिर्यारोहण मोहिमांचा अविभाज्य भाग असणारे शेर्पा, एव्हरेस्टवरील डेथ झोन, ग्रीन बूट्स अशा अनेक घटकांविषयी नव्याने माहिती मिळाली.
हे पुस्तक मी ऑडिबल अँप वर सुद्धा ऐकलं. फिलिप फ्रँकलिन यांनी ते उत्तमरीत्या कथन केलं आहे. आणि ते ई-बुक किंवा पेपरबुक प्रमाणेच तितकेच खिळवून ठेवणारे आहे. जर तुम्हाला गिर्यारोहणाची आवड असेल आणि एवरेस्ट मोहिमांविषयी कुतूहल असेल तर हे पुस्तक तुमच्याचसाठी आहे.
समीक्षण – नितिश पारकर
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
किंडल आवृत्ती (इंग्रजी) विकत घ्या
संबंधित व्हिडिओ