लेखक – रणजित देसाई
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या – २७१
मूल्यांकन – ३.७ | ५
जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात, कोणत्याही क्षेत्रात माणूस कार्यरत असला तरी जिथे त्याचा जन्म झाला, जिथे तो लहानाचा मोठा झाला त्या गावाशी त्याची जोडली गेलेली नाळ मरेपर्यंत अतूट राहते. म्हणूनच की काय, माणसाच्या जीवनाचे अंतिम सोपस्कार पार पाडण्यासाठी त्याला पुन्हा त्याच्या गावातच आणले जात असावे. थोडक्यात काय, तर मानवी जीवनाचे जन्म आणि मृत्यू हे दोन पैलू बऱ्याच अंशी त्याच्या गावाशीच निगडित असतात. अशाच एका गावाची कथा रणजित देसाई यांनी आपल्या “माझा गाव” या पुस्तकात मांडली आहे.
तात्यासाहेब नावाच्या एका ब्राम्हण पंडिताचे, आपल्याच जन्मगावी होणाऱ्या आगमनाने कथेला सुरवात होते. आपलं गाव सोडून कोल्हापूरला गेलेले तात्या; उतारवयात पुन्हा गावी परत येतात आणि काही काळातच गावाला आपलंस करून टाकतात. वैद्यबुवा असलेले तात्या आणि गावगाडा हाकणारे आप्पासाहेब इनामदार यांच्याभोवती कथा फिरत राहते. त्यांच्यातील ऋणानुबंधाचे वर्णन लेखकाने अचुकरित्या केलं आहे. मुळातच सरळसोट स्वभाव असलेले तात्या आणि आप्पा यांच्यातील संभाषण लेखकाने तितक्याच तोलामोलाने रेखाटली आहेत. शिकारीचा भारी नाद असलेला अप्पासाहेबांचा थोरला मुलगा रावबा, ह्याचा हातून जेव्हा मोठी चूक घडते, तेव्हा त्या सगळया प्रसंगातून इनामदार घराण्याची इभ्रत तात्या कसे वाचवतात हे वाचण्यासारखं आहे. आप्पांचा धाकटा मुलगा जया आणि त्याचा लहानपणापासून सांभाळ करणारी त्याची वहिनी उमा; यांच्यातील जिव्हाळा रेखाटताना लेखकाने शब्दांची जी निवड केली आहे त्यातून हुबेहूब प्रसंग समोर उभे ठाकतात.
गाव म्हटलं की बारा भानगडी आल्याच. मग त्यात गावावर ओढवणारी आपत्कालीन संकटेही आलीच. अशाच अनेक संकटांना तोंड देत असताना गावावर बेतलेली बिकट परिस्थिती इनामदार कसे सोडवतात, त्यातून आपल्या मुलाला जबदरीची प्रत्यक्ष शिकवण कशी देतात इत्यादी आपल्याही आचरणात आणता येतील.
अचानक एक दिवशी खबर येते की आसपासच्या गावांत रामोश्यांनी दरोडे घालायला सुरवात केली आहे. आपल्याही गावाला या दरोड्यांचा सामना करावा लागणार या भीतीने सारा गाव गांगरून जातो. अशावेळी, आप्पासाहेब गावकऱ्यांना, तरुण पोरांना हाताशी घेऊन रामोश्यांविरुद्ध नेटाने लढा देतात. गावासाठी आपले देवही विकायला काढणारे, प्रसंगी हळवा बाप होऊन मुसमूसणारे, गावाला जराही तसदी न देणारे अन गरोदरपणात आपल्या सुनेची आई बनून डोहाळे पुरवणारे असे अष्टपैलू आप्पासाहेब हे व्यक्तिमत्व मनाला स्पर्श करून जाते. मैत्रीचा, जिव्हाळ्याचा अद्भुत नमुना पेश करणारे, प्रसंगी आपल्याच घरावर तुळशीपत्र ठेवणारे व रोग्याला बघायला दिवसरात्र न पाहणारे तात्यासाहेब कथेच्या प्रत्येक टप्प्यात वाचकाचं मन जिंकून घेतात.
अशा अनेक पात्रांनी फुललेल्या या कथेचा शेवट मात्र नक्कीच हृदयद्रावक आहे. तात्यासाहेब, त्यांची पत्नी काकी व आप्पासाहेब यांच्यातील ऋणानुबंधाचे चित्रण करताना लेखकाने शब्दांत अक्षरशः प्राण ओतले आहेत. अशी ही अतिशय सुंदर, कुठेही रटाळ न वाटणारी व अनेक प्रसंगांनी नटलेली कथा वाचण्यासारखी आहे. त्यात रणजित देसाईंसारखा मुरलेला ऐतिहासिक कादंबरीकार म्हणजे सोन्याहून पिवळ. गावाशी असलेल्या आपल्या नात्याचा उलगडा लेखक कसा करतो अन त्यातून आपण देखील आपल्या गावाच्या आठवणीत कसे हरवतो हे अनुभवण्यासाठी ‘माझा गाव’ नक्की वाचा व तुमचा अनुभव अभिप्रायातून आम्हाला नक्की कळवा!
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: