लेखक – व. पु. काळे
समीक्षण – विक्रम चौधरी
पृष्ठसंख्या – १९२
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
मुल्यांकन – ४.० | ५
पत्रपेटी ला प्लेझर बॉक्स अस संबोधताना तुम्ही किती लोकांना पाहिलंय ? वाचकांच्या येणाऱ्या पत्रांना हर्ष हुंदके आणि हुंकार ह्यांच्या नजराण्यात बदलण्याची ताकत मुळात किती लेखकांकडे असेल? पोस्टमन हा सांताक्लास किती लोकांना वाटला असेल? हि किमया आणि हा दृष्टिकोन फक्त व. पु. कडेच आहे. प्रस्तावने पासून जी पत्ररूपी सुंगंधाची देवाणघेवाण सुरु होते ती तुम्हाला पुस्तक संपेपर्यंत प्रत्येक बाबतीत सुगंधित करून सोडते . अगदी खरे ह्यांचं वपूंच्या प्रत्येक क्षेत्रांत प्राप्त असलेल्या प्राविण्यावर आश्चर्य व्यक्त करणांर पत्र असो किंवा मनाची कवाडं कुठेच उघडी करायला वाव नसणाऱ्या प्रभाताईंचं पत्र असो प्रत्येक बाबतीत मानसिक आधार ह्या आनंदाच्या पेटीतून मिळतो.
प्लेझर बॉक्सच्या निमित्ताने वपूनी मराठी साहित्यात एक वेगळा प्रयोग केलाय. एक लेखक आणी वाचक ह्यांच नात इतक्या तन्मयतेने आणि संयमाने हाताळण्याची हातोटी प्रत्येक पत्राला दिलेल्या उत्तरातून दिसून येते. “आपला शब्द पलीकडे पोहोचणं ही माणसाची मूलभूत गरजांच्या खालोखालची गरज आहे”, ह्या जाणीवेने वपुनी प्रत्येक वाचकाची ही गरज पूर्ण केली.
जीवनातल्या काळ्याकुट्ट क्षणांत स्वतःचा मन मोकळं करायला सुखसंवादच एकही स्थान नसलेल्या प्रभाचा पत्राला शब्द आणि संवाद हा मानवी यंत्राचा safety valve आहे हे अगदी सहजपणे समजावून जगण्याची नवीन उमेद देणार पत्र हे आपल्याला पण बोलकं करतं.. आजच्या धावपळीच्या जीवनात ह्याच धावपळीचं, महत्वाकांक्षेचं ओझं स्वतःच्या उरावर घेऊन का फिरायचं ह्या राव ह्याच्या पत्राला समर्पक भाषेत वपु समजावतात की “गर्दीत असून गर्दीचा न होणं हा शाप नसून वरदान आहे.. समाजाच्या गर्दीतून अलिप्त होऊनच गर्दीकडे तटस्थपणे बघता येत.” रावच्या निराशेतूनही त्याचा आशावाद कसा डोकावतो हे मग त्याचा त्याला उमगू लागतं.. .
अशी वेगवेगळ्या आशयाची असंख्य पत्ररूपी संवादाची गरज वपुनी स्वतःच्या कटू गोड अनुभवांच्या शाईने, भावनेच्या कागदावर स्वतःच्या सुवाच्च अक्षराने पुरवली.. आजच्या काळात आपली अशी संवादाची गरज पुरावणारा, आपल्या भावना, दुःख, हर्ष आणि व्यक्तिमत्वाच्या छटा समजून घेणारा वाटाड्या आपल्याला मिळेल?? कदाचित नाही. पण ह्या पुस्तकातून मिळतो तो हाच आनंद, हेच समाधान की आपला दृष्टीकोन फक्त आपण सोडून कुणालातरी कळाला. कदाचित तुम्हाला पण ह्यातून वपु हे आनंदाची पोतडी हसत खेळत घेऊन फिरणारे सांता क्लोज भासतील. नक्कीच वाचा…
समीक्षण – विक्रम चौधरी
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
Khupach sundar lihal aahe…????????