लेखिका – सुधा मूर्ती
अनुवादक – उमा कुलकर्णी
समीक्षण – प्रज्ञा कडलग
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठसंख्या – १६०
समाजसेविका सुधा मूर्ती ह्यांची लिहिलेली पुस्तके नेहमी आजूबाजूला घडण्यारया घटनांवरच आधारीत असतात. अगदी साध्या सोप्या भाषेत जीवनाश्यक संदेश त्यातून मिळतो व सर्वसामान्यांच्या मनाला तो पटतोही.
शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शामण्णा, त्यांची बायको गौरम्मा व चंद्रू, गिरिश, सुरभी ही मुले असे बंगळूरला राहणाऱ्या सुखवस्तू कुटुंबाची ही कहाणी. चंद्रू जेव्हा नोकरी साठी धारवाडला जातो तेव्हा तिथे त्याचा वनितावर जीव जडतो. वनिता सोबत संसार थाटन्याचे स्वप्न पाहत असतानाच त्याच्या मनात अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळवून कायमस्वरूपी स्थायी होण्याची इच्छाही प्रबळ होत जाते. त्यासाठीच ‘स्किपींग’ करुन तो ग्रीन कार्ड होल्डरही बनतो परंतू जेव्हा भारतात परतल्यावर सत्य त्याच्यासमोर येते तेव्हा तो आईच्या खुशीकरता श्रीमंत जमुनेसोबत लग्न करुन अमेरिकेला रवाना होतो.
वनिता सारखी सुस्वभावी, प्रेमळ, लाघवी सून मिळाली असतानाही गौरम्मा व सुरभी कायम जमुनेलाच मान देत असतात कारण ती ह्या घरची ‘डॉलर बहू’ असते. ह्या डॉलरची भुरळ त्यांना एवढी पडली होती की जमुना म्हणेल तेच खरे असे त्या मानायाच्या. ह्या वागणूकीमुळे वनिताचा ‘स्व’ दुखावला जायचा. कालांतराने गौरम्माला जेव्हा अमेरिकेत जायचा योग येतो, तेव्हा तिच्यासमोर जमुनाचा खरा चेहरा उघड होतो आणि वानिताबद्दल गौरम्माच्या मनात आपुलकी निर्माण होते की नाही, हे जाणुन घ्यायला कादंबरीच वाचायला हवी.
ही कथा जरी १३ वर्षांपूर्वी लिहिलेली असली तरी ती आजच्या समाजालाही चपखलपणे लागू होते. कथेतून नीती मुल्ये, नाते संबंध ह्यापेक्षा लोक पैश्यालाच महत्त्व देणारे दिसतात. परंतू पैश्यापेक्षा प्रेम भावना किती महत्वाच्या असतात, ह्याचे संदर्भ सुधाजींनी वेगवेगळ्या प्रसंगातून मांडले आहे. ही कादंबरी जरी ‘प्रेडीक्टेबल’ असली तरीसुध्दा एकदा हातात घेतल्यावर पुर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवायची इच्छा होत नाही. हीच सुधा मूर्ति यांची लेखिका म्हणून खासियत आहे असे म्हणायला हरकत नाही.
समीक्षण – प्रज्ञा कडलग
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ