लेखक – व. पू. काळे
समीक्षण – प्रज्ञा कडलग
पृष्ठ्संख्या – १७८
प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाउस
मुल्यांकन – ३.९ | ५
आजोळी गेल्यावर काहितरी वाचावे, म्हणून सहज हातात घेतलेले हे पुस्तक व त्यातील मनाला पटणारे अनेक वपू विचार वाचल्या क्षणीच वपूंच्या लेखनशैलीवर मन बसवून गेले. वपुंचे कादंबरीलेखन अगदी मोजकेच आहे. त्यातही ‘ही वाट एकटीची’ ही पहिलीच कादंबरी. शिवाय महाराष्ट्र शासनाचा मिळालेला पुरस्कार, हे तिचे वैशिष्ट्य अधोरेखीत करते.
कथेची नायिका बाबी (विद्युलता) नावाप्रमाणेच सळसळणारी बिजली. वडिलांच्या साहेबाच्या मुलासोबत झालेली मैत्री, मनात अवचित फुलणारे प्रेम व त्यातून जगाच्या दृष्टीने घडलेला अपघात तिच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी देतो. परंतू, तरीही डगमगुन न जाता स्वताच्या तत्वांसाठी समाजाशी आणि आप्त स्वकीयांसोबत ती निर्धाराने लढा देते.
साध्या सरळ भाषेमध्ये तरीही तेवढ्याच ताकदीने गहन विषयावर भाष्य करणारे प्रसंग दर्शवताना वपू कधी वाचकांच्या काळजाला हात घालतात हे कळतच नाही. बाबीचे धीटपणे सर्व संकटाना समोरे जाणे जेवढे मनाला पटते तेवढेच तिची एकाकी झुंझ वाचकाना भावुक करते. अनेक अश्याच प्रकारच्या समजात वावरणाऱ्या स्त्रियांबद्दल आपल्या मनात एक विलक्षण पोटतिडकी निर्माण होते.
बाबीच्या ह्या एकाकी लढ्यासाठी, निर्धारी स्वभावासाठी, वपूनी मांडलेल्या आधुनीक पण तेवढेच परखड मतांसाठी हे पुस्तक नक्कीच वाचावे असे आहे. पुस्तकाची एक बाजू समजून घेताना आपण अनेक उलगडणाऱ्या पदरामध्ये अडकतो. आणि ती एकटीची वाट आपल्याला आपलीच वाटू लागते. अशा अनेक कारणांमुळे हे पुस्तक वाचकांसाठी एक पर्वणीच आहे.
समीक्षण – प्रज्ञा कडलग
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
#ही वाट एकटीची – व. पु. काळे
वपु काळे यांच्याबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे. त्यांच्या प्रत्येक पुस्तकाची एक वेगळीच खासियत आहे. प्रगल्भ विचारशक्ती आणि प्रवाही भाषा हेच त्यांचे वैशिष्ट्य. आज पर्यंत वपुंची बरीच पुस्तके वाचण्यात आली. त्यातलीच एक म्हणजे ‘ ही वाट एकटीची. ‘ वपु काळे यांची पहिलीच आणि अत्यंत गाजलेली कादंबरी. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.
वपु हे सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर इमारत, सुंदर रस्ते, सुंदर हस्ताक्षर, मनाने सुंदर असणाऱ्या व्यक्तीचे चाहते होते. म्हणूनच त्यांच्या कथा – कादंबऱ्या ह्या सुंदर मनांवर आणि विचारांवर आधारित असतात. मनातल्या प्रत्येक कप्प्याचे उत्तम निरीक्षण दिसून येते. यांच्या बहुतेक कथा विनोदी असल्या तरी त्यातून सत्य परिस्थिती दिसून येते.व्यक्तीच्या आचार- विचारांच्या पद्धतीला वपु ‘ पॅटर्न ‘ म्हणत असे. महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘ उत्तम लेखक ‘ म्हणून सन्मानित केले आहे.
‘ ही वाट एकटीची ‘ या कादंबरीतून आपल्याला जीवनविषयक कठोर तत्वज्ञान परखडपणे ‘ बाबी ‘ या नायिकेच्या माध्यमातून मांडले आहे. तिच्यातला खरेपणा हीच तिची सर्वात मोठी ताकद असते. नेहमी सत्याच्या बाजूने निर्भिडपणे लढणाऱ्या ‘ बाबी ‘ च्या आयुष्यात मात्र नियतीने सगळा खोटा डाव रचला होता. खोटेपणाचा/ असत्याचा तिरस्कार करणाऱ्या बाबी ला समाजातल्या त्या कपटी आणि खोटे बोलणाऱ्या लोकांचा नेहमीच तिटकारा होता. नायिकेत असणारी सत्वशिलता आणि धैर्य कौतुकास्पद आहे.
कादंबरीतल्या नायिकेची प्रतिकाराची भाषा, तिचे संवाद आणि स्वसंवाद वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तिच्यात उठणाऱ्या सत्याच्या ठिणग्यांनी सत्याची बाजू अजूनच प्रकाशित होते. एकदा तरी हा अनुभव प्रत्येकानी घ्यायला हवे. ह्या पुस्तकातून एका कणखर नायिकेचा प्रवास दाखविला आहे.
#नंदिता शेवाळकर