लेखक – वि. दा. सावरकर
समीक्षण – हर्षाली वरखडे
पृष्ठसंख्या – २८८
प्रकाशन – रिया प्रकाशन
मूल्यांकन – ४.५ | ५
सावरकरांची हि तिसरी कादंबरी. त्यांच्या ‘माझी जन्मठेप’ या कादंबरीवर इंग्रजांनी १७ एप्रिल १९३४ साली बंदी घाली. ती बंदी उठवावी म्हणून प्रयत्न करत असतानाच सावरकरांनी ‘काळे पाणी’ हि कादंबरी लिहीण्याचा घाट घातला. यामागचा उद्देश एवढाच होता कि अंदमानातील कष्टकारक, दुःखदायक, क्लेशदायक आणि एकूणच अन्यायकारक जीवन कसे जगावं लागते हे दर्शवण्यासाठी त्यांनी हि कादंबरी लिहिली. प्रेम हि अगदीच कोवळी आणि हळुवार भावना आहे, त्यामुळे सुरुवातीला सावरकरांसारख्या देशासाठी लढताना प्रसंगी कठोर होणाऱ्या आणि इंग्रजांशी कणखरपणे तोंड देणाऱ्या योद्धयाकडून प्रेमावर कादंबरी म्हटली कि भुवया उंचावतातच. पण सावरकरांनी मात्र या कादंबरीला पुरेपूर न्याय दिला आहे.
पुस्तकातील कथानक प्रमुखतः दोन मालती आणि किशन या पात्रांभोवती फिरत असले तरी त्यात बाकीच्या पात्रांनीदेखील आपापल्या परीने रंग भरून कथानकाची शोभाच वाढवली आहे. किशन – मालतीमधे अगदी ओझरती झालेली ओळख आणि नंतर भयाण आणि भेसूर परिस्थितीतून मार्ग काढत असताना एकमेकांवर जडलेलं प्रेम, आपल्या मनात त्यादोघांबद्दल आत्मियता निर्माण करते. परिस्थितीमुळे दोघांची अंदमानात झालेली रवानगी, अंदमानातले अंधारी आणि भयावह वाटणारे कारागृह, रोजच होणाऱ्या मरण यातना आणि तरी हि एकमेकांविषयी असणारी ओढ आपल्या हि डोळ्यात नकळतपणे पाणी आणते. एक मुलगा हरवलेला असल्यानेआपल्या एकूलत्याएक मुलीवर जीव ओवाळून टाकणारी आई, राक्षसी वृत्तीचा रफीउद्दीन तसेच अंदमानात ओळख झालेले १८५७च्या युद्धातील अप्पाजी आणि वेळप्रसंगी मदत करणारे जावरे जातीचे सहकारी हे मनुष्याच्या स्वभावधर्माचे दर्शन घडवतात.
सावरकरांनी स्वतः अंदमानातील कष्टप्रद जीवन भोगलेले असल्याने त्यांनी त्यांच्या उच्च दर्जाच्या लेखणीतून ते अगदीच अप्रतिम मांडले आहे. ज्यांच्या गाठी असे कटू अनुभव असतात आणि त्यावर अनुसरूनच जर कादंबरी असेल तर शक्यतो कादंबरी रुक्ष होण्याची शक्यता असते. पण सावरकर मात्र आपल्या लिखाणात हा समतोल राखण्यात अगदीच यशस्वी झाले आहेत. त्यांनी कैद्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांचा आरसा मांडला असला तरी काही कैद्यांना हीच शिक्षा कशी बरोबर आहे हेदेखील सांगितले आहे. या कैद्यांमुळेच मनुष्यवस्तीस योग्य नसणारी जमीन, अशा शिक्षेमुळे कशी योग्य करता आली याचा हि उत्तम नमुना त्यांनी मांडला आहे. यातून त्यांचे उदारतेचे आणि तटस्थपणाने सगळ्या गोष्टीकडे बघण्याच्या दृष्टीचे कौतुक वाटते. काही ठिकाणी भाषा किंवा काही शब्द समजण्यास थोडे कठीण वाटतात, तरीही बऱ्याच ठिकाणी काही शब्दांचे इंग्लिश प्रतिशब्द हि दिले असल्याने योग्य तो संदर्भ लागण्यास सोपे झाले आहे. उलट माझ्या दृष्टीने या कादंबरीची भाषा हि उत्तम प्रतीच्या लेखनाचा एक नमुनाच आहे.
अंदमानातील यातनामय जीवन आणि एक सुंदर तरल प्रेमकहाणी सावरकरांनी अशा तऱ्हेने गुंफली आहे, कि त्यामधून एका उच्च दर्जाच्या लेखकाचे, कवीचे किंबहुना एका उत्कृष्ट साहित्यिकाचेच दर्शन होते. तुम्हाला जर प्रेमकथा वाचायला आवडत असेल आणि सावरकरांच्या हि साहित्यिकाची भावूक बाजू जाणून घ्यायची असेल तर हि कादंबरी वाचायलाच हवी !
समीक्षण – हर्षाली वरखडे
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ