mogara fulala marathi book review cover

मोगरा फुलला

पोस्ट शेयर करा:

पुस्तक – मोगरा फुलला

लेखक – गोपाल नीलकंठ दांडेकर 

समीक्षण – मृणाल जोशी

प्रकाशन – मृण्मयी प्रकाशन

मोगरा फुलला पुस्तकाचे मुखपृष्ठ वाचकाला कमालीचं आकर्षित करतं- ध्यानमग्न असलेला योगी ज्याच्या कपाळावर अष्टगंध – बुक्क्याचे गंध, आसक्ती व अनासक्तीहुन दूर असलेला हा योगी, केस मोकळे सोडलेला ; डोळे शांत मिटलेला. ही कथा आहे एका कोवळ्या तेवीस – चोवीस वर्षाच्या मुलाची त्याच्या आई – वडिलांची , भाऊ – बहिणीची आणि त्याच्या वलयात जे जे कोणी सामावलेले आहे त्यांची . ह्या पुस्तकाला जर वाचकाने केवळ अध्यात्मिक दृष्टिकोनातून बघण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न केलास तर तो लेखकावर फार मोठा अन्याय होईल. ही कहाणी आहे विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची, ही कहाणी आहे संत परंपरा पुढे नेणाऱ्या एका ज्ञानवल्लीची.

एका शुभ्र सुगंधित टवटवीत सतेज ज्ञानरूपी फुलणाऱ्या मोगऱ्याच्या फुलाची आणि त्याच्या बहरणाऱ्या वेलीची ही कथा आहे. अनेक रूपके घेऊन मधाळ आणि ओघवत्या भाषेत नटलेली सुंदर कादंबरी. ही कथा आहे अत्यंत प्रतिभासंपन्न लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदा) यांच्या अभिनव शब्द उप्तत्तीतून उमललेल्या – फुललेल्या मोगऱ्याची…”मोगरा फुलला”.

अत्यंत वेगळ्या मराठीभाषेचे लेणं ल्यालेले हे पुस्तक आहे , इतर मराठी कादंबऱ्यांत जी मराठी भाषा आपण वाचतो बघतो त्याहुन अत्यंत आगळी वेगळी भाषा ह्या पुस्तकात आपल्या वाचनात येते, त्यात लेखकाने आळंदी, नेवासे, पैठण, सिद्धबेट ह्या भौगोलिक भागातील बोलीभाषेच्या मदतीने मांडली आहे. विठ्ठलपंत गोविंदपंत कुलकर्णी ह्या एका इसमाची कथा सुरु होते – जेजुरी , त्र्यंबक सारख्या सिद्ध स्थळाच्या यात्रेतून. संपूर्ण कादंबरी कावेरी, भट्टदेव, गोविंदपंत आणि नामयाची जनी ह्या चारी वक्त्यांच्या मुखातून हळू हळू वेग घेत जाते. 

सांख्यशास्त्राच्या अभ्यासाच्या आकर्षणामुळे विठ्ठलपंत आपला संसार वाऱ्यावर सोडून काशीस जातात, तिथून ते परत कसे येतात याचे वर्णन गोनीदांनी इतके सुंदर केले आहे ज्याला खरोखर तोड नाही. विठ्ठलपंत आणि रुख्मिणी ह्या दाम्पत्याला चार अपत्य होतात – निवृत्ती – ज्ञानदेव – सोपान आणि मुक्ताई, ह्यातल्या ज्ञानदेवांची कथा म्हणजे मोगरा फुललाचा मूळ गाभा आहे. लेखक वाचकाला आपल्या लिखाणाच्या कलाकृतीतून संपूर्णपणे बांधून ठेवतो तो शेवटच्या शब्दापर्यंत! प्रतिभासंपन्न लेखक म्हणतात ते ह्यालाच.

चारी भावंडे जे जे समोर येईल ते ते स्वीकारत, कधी फुलांच्या सड्यावरून चालत तर कधी काट्यातून ठेचकाळत पुढे चालत राहतात, भारतभर भ्रमण करतात – देशाटन करतात. एकदा लोकं ज्ञानदेवांवर चिखल फेकतात, भिक्षुकांची पोरं म्हणून हिणवतात त्यावर रागावून घरी येऊन ज्ञानदेव स्वतःला कुटीत बंदिस्त करून घेतात; लाडक्या भावाचा राग जाण्यासाठी त्यावेळी मुक्ताईंनी मोठे सुंदर अभंग रचून ज्ञानोबांची समजूत काढते – 

चिंता क्रोध बाजूला सारा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||

निर्वासितांची मुले – वैराग्याची मुले हा आपल्या कपाळी आलेला आळ पुसण्यासाठी चौघेही भाऊ बहीण सिद्धबेट येथून आळंदीस गेले, तिथे शास्त्राला काही आधार सापडेना तिथल्या शास्त्र्यांनी तिथून पैठण येथे जाण्यास सांगितले, हे सगळं सांगण्याचा मुद्दा हा कि, तिथून पैठण येथे पायी चालताना एकूण २७ दिवस लागतात त्यात ज्ञानोबा रोज चार सहा ओळीं रोज बोलायचे – गायचे, पैठण येउसतवर २७ कडव्यांचे सुंदर अभंगप्रत काव्य तयार झालें त्या नंतर ज्ञानोबा माउलींनी ज्या भागवताचा झेंडा हाती घेऊन प्रचार प्रसार करून “वारकरी” संप्रदाय स्थापित केला व त्या २७ कडव्यांचे अभंग म्हणजे आम्ही तुम्ही म्हणतो तो “हरिपाठ”:

देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया ॥

ज्ञानदेवो म्हणे व्यासाचिये खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ 

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आपली उत्पत्ती का झाली हे माहिती करून ज्ञानेश्वर माउली “भावार्थ दीपिका” (सार्थ श्रीज्ञानेश्वरी) म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेली श्रीमद्भगवत्गीता प्राकृत मऱ्हाटी भाषेत इथल्या गोर गरीब जनतेसाठी आपल्या शब्दरूपी अमृताने खुली केली. 

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ 

जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥

देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥

म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥

ज्यांनी जे वांछीले त्यांना ते मिळाले, ज्ञानेश्वरी लिहून झाली, पांडुरंगाची शेवटली वारी झाली, वारकरी धर्माचा झेंडा आकाशात फडकू लागला आणि उरलेल्या आयुष्यात आता काही एक शिकण्यासारखे नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेण्याचा उत्कट प्रसंग गोनीदांनी तंतोतंत मांडला आहे , तो भावनिक प्रसंग वाचताना अक्षरशः डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात – अंगावर काटा येतो, भावनाप्रधान लेखणी किती कमाल करू शकते हे नेमकं तो प्रसंग वाचताना जाणवते. 

नामा म्हणे आता लोपला दिनकर | बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ || 

त्या काळातील प्रसंग, शब्द, शब्दोच्चार, पुरातन समाजातील विकृत्या, पारंपरिक घडामोडी ह्यावर गोनीदा नेमकेपणाने लिहिताना अनेक प्रश्नांवर – विषयांवर भाष्य करतात , त्या काळातील माणसांच्या स्वभावातील तसेच संस्कृतीतील गुण-दोष अत्यंत पोटतिडकीने ह्यात अचूकपणे मांडले आहे. ही कादंबरी लिहिताना – मानसशास्त्र – योगशास्त्र – भावनाप्रधानता- मानवीय नातेसंबंध व त्यांची जडण घडण – भौगोलिक मांडणी – अध्यात्मशास्त्र – त्यांच्या मागचा वैज्ञानिक दृष्टिकोन इतक्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांचा विचार आणि अभ्यास लेखकाने केलेला आहे, हे सहज दिसून येतं. 

एका खरोखर अभ्यासक वृत्तीने गोनीदांनी त्या काळातील मानवीय समाज, सभ्यता, तत्त्वप्रणाली, त्या काळातील संस्कृतीचे मूल्य ह्यावर रोखठोक मतं मांडली आहे, ज्या काळात स्पृश्यता – अस्पृश्यता सर्वतोपरी मानली जायची, ज्या काळात आळंदी – पैठण येथे मोठे शास्त्री – पंडित आपले निर्णय द्यायचे, त्याला छेद देण्यासाठी आणि प्रवास किंवा देशाटनाने माणूस किती प्रगल्भ होऊ शकतो ह्याची महती पटवून देण्यासाठी ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायात “वारी” चे महत्व सांगितले आहे , इतकंच काय त्यांनी ओव्याबद्ध केलेल्या ज्ञानेश्वरीचा मुख्य गाभा अध्यात्मा सोबत वैज्ञानिक देखील आहे हे सांगून ही न पटणारे विधान आहे. ज्या काळात धार्मिक तेढ वाढली होती, लोकांमधली जाती पातीची भावना आपल्या चरमसीमेवर होती त्या काळात शब्दरूपी काव्य मांडून ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, मुक्ताई ह्या संतपरंपरेच्या थोर मंडळींनी त्याकाळातील समाजाची रूपरेषा, लौकिक – अ-लौकिक, धार्मिक विकृत्या, वैज्ञानिक दृष्टीकोनाची कमतरता नेमकी मांडली आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला, त्यामुळे लोक प्रगल्भ झाले. समाज प्रगल्भ झाला.

मोगरा फुलला हे पुस्तक कादंबरी विश्वात आपलं भावविश्व स्थान राखत एक वेगळीच उच्चांक पातळी गाठते ह्यात दुमत असण्याचे काहीच कारण नाही. भावनाप्रधान – रसाळ – ओघवती आणि तितकीच प्रसंगारूप – प्रतिभासंपन्न लेखनशैलीतुन गोपाल नीलकंठ दांडेकर ह्यांच्या ह्या कादंबरीला अनेकविध कंगोरे आहेत. 

पुस्तक संपल्यावर लताबाईंनी गायलेल्या अभंगाच्या ओळी नकळत तुमच्या मनाचा ताबा घेत जातात, पुस्तक संपताच क्षणी मन – चित्त फार शांत शांत – मनोहारी आणि चैतन्यमयी होतं जाते ह्यात काहीच शंका नाही.फुलें वेचिता बहरु कळियांसी आला. मोगरा फुलला..मोगरा फुलला.

समीक्षण – मृणाल जोशी

mogara fulala gonida gopal nilkanth dandekar mrunal joshi mrunmayi


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:

पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published.