लेखिका – मोनिका हलन
प्रकार – ऑडिओबुक
कथन – वीणा फणसळकर
वेळ – ६ तास
प्रकाशन – ऑडिबल स्टुडिओ
मूल्यांकन – ४.२ । ५
अर्थ विषयक भारतीय मानसिकता तशी पारंपरिक आणि कमी जोखीम घेण्यावर भर देणारी आहे. सोनं खरेदी करणे हि भारतीयांची आवडती गुंतवणूक. पण वेळे नुसार हि मानसिकता बदलली पाहिजे का? गुंतवणुकीसाठी इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? कोणते म्युच्युअल फंडस् गुंतवणुकीसाठी योग्य आहेत? रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक केली पाहिजे का? इन्शुअरन्स पॉलिसीज गरजेच्या आहेत का? निवृत्ती नियोजन कसं केलं पाहिजे? किती गुंतवणूक केली पाहिजे? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मोनिका हलन लिखित “लेट्स टॉक मनी” या पुस्तकात मिळतील.
मोनिका हलन, मिंट च्या संपादिका आणि अर्थ विश्वातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. “लेट्स टॉक मनी” या पुस्तकाद्वारे त्यांनी वयक्तिक अर्थ नियोजन (पर्सनल फायनान्स) हा विषय सर्व वर्गातील वाचकांसाठी सहजतेणे मांडला आहे. हे पुस्तक वाचून लोक कमी चुकीचे अर्थ विषयक निर्णय घेतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे. पारंपरिक अर्थविषयक विचारसरणीच्या वाचकांसाठी नवीन जगाचे नवीन नियम, नवीन संधी यांच्याशी जुळवून घेणं कठीण जाऊ शकत परंतु महागाई सोबत वयक्तिक अर्थार्जन वाढवणे देखील गरजेचं आहे. त्यामुळे हे बदल आवश्यक आहेत. मोनिका हलन यांनी खूप सोप्या शब्दात गुंतवणूक म्हणजे काय, ती कशी आणि कधी करावी, कधी आणि कशात करू नये, पैसे तुमच्यासाठी काम कसे करतील या सर्व गोष्टी उत्तमरित्या मांडल्या आहेत.
“लेट्स टॉक मनी” हे पुस्तक तुम्हाला श्रीमंतीची वाट दाखवणार असलं तरी ते तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत बनवणार नाही (अशी अपेक्षा कोणत्याही गुंतवणुकीकढून करणे चुकीचं आहे). तुमच्या कडे असलेले पैसे तुम्ही येणाऱ्या गरजांसाठी कसे इन्व्हेस्ट करू शकता यावर ते भाष्य करत. जर तुम्ही सेविंग्स अकाउंट मध्ये किंवा फिक्स डिपोसीट मध्ये पैसे ठेवून समाधानी असाल तर तुम्ही शक्यतो महागाई चा दर गाठू शकणार नाही. त्यासाठी इतर काही पर्याय पुस्तकात सुचवले आहेत.
पुस्तकाची सर्वात जमेची बाजू म्हणजे तुम्ही तुमच्या पर्सनल फायनान्स ऍडवायसर सोबत सवांद साधत आहात असं वाटत. अर्थात वीणा फणसळकर यांनादेखील त्याच श्रेय द्यायला पाहिजे. पुस्तकात दिलेली उदाहरणे तर साधी, सोपी आणि मनाला भिडणारी आहेत आणि त्यातील बरेचसे प्रसंग तुम्ही अनुभवले देखील असतील. मोनिका हलन यांनी फक्त गुंतवकीबद्दल लिहीलच नाही तर त्यासोबत त्यांनी स्वतः ज्या गोष्टी अमलात आणल्या आहेत त्या बद्दल हि लिहिलं आहे.
एकूणच मोनिका हलन यांचा अर्थ विश्वाचा सखोल अभ्यास, उत्तम लिखाण शैली, उत्कृष्ट उदाहरणे, सोप्या पद्धती आणि एकूणच अनेक भारतीयांसाठी उपयुक्त ठरेल असा पर्सनल फायनान्स प्लॅन या सर्व गोष्टी या पुस्तकाला वेगळ्याच उंची नेऊन ठेवतात. माझ्या मते “लेट्स टॉक मनी” हे पुस्तक प्रत्येक भारतीयाने एकदा तरी वाचावं / ऐकावं असं आहे आणि हे पुस्तक नक्कीच अर्थ विषयक पुस्तकांमध्ये एक महत्वाचं स्थान निर्माण करेल.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ