लेखक – टी. हार्व एकर
कथन – चार्ल्स कॉन्स्टंट
प्रकार – ऑडिओबुक
वेळ – ५ तास १० मिनिटं
प्रकाशन – हार्पर ऑडिओ
मूल्यांकन – ४.२ । ५
“पैसे झाडाला लागतात का?” हे वाक्य आपण लहानपणापासून कदाचित असंख्य वेळा ऐकलं असेल. या वाक्या ऐवजी आपण “पैश्यांच झाड कसं बनवता येईल?” हे वाक्य ऐकत मोठे झालो असतो तर कदाचित आपली आर्थिक स्थिती आजच्या पेक्षा कैक पटींनी उत्तम असती. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? ज्यांनी कोणी अवचेतन मनाबद्दल वाचलं आहे त्यांना हे नक्की समजलं असेल कि तुम्ही तुमच्या मनाला जे प्रश्न सोडवायला सांगता ते प्रश्न तुमचं मन या ना त्या मार्गाने सोडवतच.
आपली मानसिकता बहुतेक वेळा आपल्या पालकांनी, नातेवाइकांनी, मित्रांनी आणि सभोवतीच्या व्यक्ती यांच्या सहवासातून तयार होत जाते. हि मानसिकता तुम्हाला श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी पूरक असेलच असं म्हणणं योग्य ठरणार नाही. श्रीमंत व्यक्ती सामान्य लोकांपेक्षा खूप वेगळ्या पद्धीतीने विचार आणि कृती करतात. श्रीमंत लोकांची मानसिकता कशी असते आणि ती जाणून घेऊन ती तुम्ही स्वतःसाठी कशी वापरू शकता या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला “सिक्रेट्स ऑफ मिलियनेर माईंडसेट” या पुस्तकात मिळतील.
पुस्तक जर श्रीमंत मानसिकता घडवण्याबद्दल असेल तर लेखक सुद्धा श्रीमंत असायलाच हवा आणि तो आहे (टी. हार्व एकर यांची नेट वर्थ ३ मिलियन डॉलर्स आहे *डिसेंबर २०२०). पुस्तक मुख्यरित्या तुमची आर्थिक मानसिकता बदलण्यावर जोर देत. जे तुम्ही यापूर्वी शिकला आहात कदाचित तुम्हाला ते विसरून नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. पुस्तकात १७ “वेल्थ फाइल्स” दिल्या आहेत ज्या प्रामुख्याने श्रीमंत आणि सामान्य यांच्या विचारांमधील तफावत दर्शवतात. त्या कशा पद्धतीने तुम्हाला श्रीमंत मानसिकतेसाठी आत्मसात करता येतील तेही लेखकाने सविस्तर पद्धतीने मांडलं आहे. पुस्तकाचा सार तुम्हाला स्वतःला घडवणे आणि तुमच्या कंफर्ट झोन मधून बाहेर येऊन नवीन गोष्टी आत्मसात करणे हा आहे. हे पुस्तक, “थिंक अँड ग्रो रिच” आणि “रिच डॅड पुअर डॅड” या दोन्ही पुस्तकांपेक्षा उजवं ठरत. पुस्तक वाचनीय तर आहेच पण शक्य असल्यास या पुस्तकाची ऑडिओबुक एका कारण ती जास्त प्रभावी ठरते. एकूणच मानसिकता घडवण्यासाठी वेळ आणि परिश्रम दोन्ही आवश्यक आहेत जर तुम्ही झटपट श्रीमंतीच्या शोधात असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी नाही. आणि पुस्तक वाचण्या/ऐकण्या पूर्वी, अवचेतन मनाबद्दल थोडी माहिती वाचल्यास पुस्तकातील काही कॉन्सेप्ट्स चटकन समजतील. एकूणच टी. हार्व एकर लिखित “सिक्रेट्स ऑफ मिलियनेर माईंडसेट” हे पुस्तक सर्वानी वाचलंच पाहिजे असं आहे.
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:
संबंधित व्हिडिओ