लेखक – हारुकी मुराकामी
प्रकाशन – विंटेज
समीक्षक – अभिषेक गोडबोले
पृष्ठसंख्या – २२८
मुल्यांकन – ४.१ | ५
हारुकी मुराकामी नावाच्या लेखकाबद्दल आणि त्याच्या लिखाणाबद्दल बऱ्याच ठिकाणाहून ऐकल्यानंतर मुंबईत एका फुटपाथवरच्या स्टॉल वरून मी त्याचं ‘मेन विधआउट वूमन'(Men without Women) पुस्तकं उचललं. मुराकामीचं आणि पुस्तकाचं अशी दोन्हीपण नावं इंटरेस्टिंग वाटली त्यामुळं घेतल्यावर लगेच वाचायला सुरुवात केली.
हा सात लघुकथा असलेला कथासंग्रह असून यातल्या कथा अश्या व्यक्तींच्या आहेत ज्यांनी प्रेयसीच्या रूपाने, बायकोच्या रूपाने स्त्रीला गमावलेलं आहे आणि आता एकटं आयुष्य जगत आहेत. त्या सगळ्यांच्या याच निरस, दुःखी जगण्याचं वर्णन मुराकामीने रंजकपणे मांडलेलं आहे. निरस आणि रंजक हे विरुद्धार्थी असलेले शब्द मुराकामी त्याच्या लिखाणाच्या शैली मधून त्यांना एकत्र आणतो आणि त्यानं तयार केलेल्या त्या जगामध्ये आपल्याला गुंतवून ठेवतो.
मुराकामीचं लिखाण सोपं आणि विचार करायला लावणारं वाटतं. त्याची पात्रं फार बोलत नाहीत. छोटी आणि अर्थपूर्ण वाक्य ही त्याची खासियत वाटते. या गोष्टी वाचताना आता काहीतरी खळबळ होणारे असं सारखं वाटतं राहतं. एखादी आर्ट फिल्म बघत असल्याचा अनुभव येत राहतो. फारसं काही घडलं नाही तरी गोष्टीत पुढं काय होतंय? याची उत्सुकता लागून राहते आणि आपण एकामागून एक पान पलटत राहतो.
या कथासंग्रहामध्ये आलेल्या कथा वाचून मुरकामीने लिहिलेलं बाकीचं लिखाण शोधून तेही वाचून काढावं असं वाटतं. या लेखकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो म्युजिक अल्बम, काही खास गाणी आणि चित्रपट यांचा उल्लेख जागोजागी करत असतो, ते उल्लेख बघून एकदातरी गुगल वर सर्च करून बघण्याची इच्छा होतेच!
एकंदरीत तुम्हाला आपण नेहमी वाचतो त्यापेक्षा वेगळ्या धाटणीचं काही वाचायचं असेल, रोजच्या पेक्षा वेगळ्या जगात घडणाऱ्या पण आपल्या भावभावनांशी जवळीक साधणाऱ्या गोष्टी ऐकायच्या असतील किंवा कुठलाच ठराविक असा विचार डोक्यात न घेता कुठलंही एक नवीन पुस्तकं हातात घ्यायचं असेल तर ‘मेन विधआउट वूमन’ हा उत्तम पर्याय आहे!
समीक्षक – अभिषेक गोडबोले
ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स: