genius marathi book review cover

जिनियस : जग बदलणारे अणुविज्ञान

पोस्ट शेयर करा:

लेखक -अच्युत गोडबोले, दीपा देशमुख 

पृष्ठसंख्या – २६७

समीक्षक – अभिषेक गोडबोले

प्रकाशन – मनोविकास प्रकाशन 

मुल्यांकन – ४.८ | ५

अच्युत गोडबोलेंच मुसाफिर हे पुस्तकं वाचलं आणि ते इतकं आवडलं कि त्यानंतर कधीही पुस्तक प्रदर्शनात किंवा पुस्तकाच्या दुकानात गेलो कि ज्यावर त्यांचं नाव असेल ते पुस्तक घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी जी पुस्तकं घेतली त्यावेळीच हि जग बदलणाऱ्या जिनियस व्यक्तिमत्वांची रंजक,प्रेरणादायी आयुष्यगाथा आणि कार्य मांडणारी अच्युत गोडबोले आणि त्यांच्या सहलेखिका दीपा देशमुख यांनी लिहिलेली ‘जिनियस’ हि सिरीज हाती लागली.

अच्युत गोडबोलेंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे एखादा अवघड विषय सोप्या भाषेत समजावून सांगायची त्यांची हातोटी.त्यांचं कुठल्याही विषयावरचं पुस्तक म्हणजे ते आपल्याला शेजारी बसवून एकेक गोष्ट उलगडून सांगताहेत असं वाटावं इतकं सोपं ते लिहितात आणि त्यामुळं विज्ञान असेल, अर्थकारण असेल, हिंदुस्थानी आणि पाश्चात्य शास्त्रीय संगीत असेल इथंपासून ते मानसशास्त्रावरची त्यांची पुस्तकं असतील अशी कुठल्याही विषयावरची त्यांची पुस्तकं आपल्याला त्या विषयाची गोडी लावल्याशिवाय राहत नाहीत.

शाळेत असताना ज्या सरांचं किंवा मॅडमचं  शिकवणं मला आवडायचं तो विषय मला आवडायचा आणि यात विज्ञान कधीच आलं नाही त्यामुळं तो विषय मला जास्त जवळचा कधी वाटला नाही पण हि पुस्तकं वाचताना आपण किती रंजक गोष्टींपासून एवढी वर्ष विनाकारण लांब होतो हे लक्षात आलं.

सिरीजमधलं हे पुस्तकं आहे लीझ माइट्नर या ऑस्ट्रियामध्ये जन्मलेल्या आणि आपलं बरंचसं महत्वाचं कार्य जर्मनीमध्ये पार पाडणाऱ्या एका महान आणि तरीही एका अर्थानं उपेक्षित राहिलेल्या महिला शास्त्रज्ञावरचं ! “माझं काम हीच माझी ओळख आणि तेच माझं चरित्र” या लीझच्या वाक्यापासून सुरु होणारा या पुस्तकाचा प्रवास आपल्याला एका रोमांचकारी अनुभव देऊन जातो. या लेखकांच्या जोडीने लीझचं  संपूर्ण आयुष्य मांडलेलंच आहे पण विशेष म्हणजे लीझनं भौतिकशात्रात केलेलं काम खूप सोप्या शब्दात सांगितलेल आहे.

कुठल्याही व्यक्तीचं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर त्या वेळची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती समजून घेणं गरजेचं असतं. लीझच्या आयुष्यावर परिणाम करणारी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धावेळी उध्दभवलेली दुर्दैवी परिस्थिती, हिटलरची मनमानी, तिनं स्वतः प्रोटेस्टंट धर्म स्वीकारलेला असूनही तिचे पूर्वज ज्यू असल्यामुळे तिला करावं लागलेलं स्थलांतर, तिचे आणि ऑटो हान या शास्त्रज्ञाचे अनेक चढउतार पाहिलेले निखळ मैत्रीपूर्ण संबंध, तिचे समकालीन आणि विज्ञान क्षेत्रात काम करणारे अर्नेस्ट रुदरफोर्ड, जेम्स फ्रॅंक, मॅक्स प्लॅन्क यांच्यासारखे शास्त्रज्ञ आणि त्यांचं आयुष्य यांची लीलया गुंफण यात केलेली आहे.

लीझ माइट्नर हि ऑस्ट्रियाची. तिची शिकायची इच्छा असूनही कायद्याच्या धाकामुळे चौदाव्या वर्षी तिला शिक्षण सोडून घरी बसावं लागलं. वयाच्या तेविसाव्या वर्षी स्त्री-पुरुष समानतेचे वारे वाहायला लागल्यावर लीझनं विद्यापीठाची परीक्षा दिली आणि भौतिकशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. किरणोस्तर्ग आणि अणुगर्भ विज्ञान यात तिनं मूलभूत संशोधन केलं. तिला जेव्हा संशोधनातल्या कामगिरीसाठी पदक मिळालं तेव्हा ती केवळ एक स्त्री आहे म्हणून तिला पदक नं देता तिनं पदकाची प्रतिकृती स्वीकारावी असं सुचवण्यात आलं परंतु स्वाभिमानी लिट्झनं त्याला नकार दिला. तब्बल पंधरावेळा नामांकन मिळूनही केवळ स्त्री असल्याकारणाने तिला नोबेल पारितोषिक दिलं गेलं नाही. 

अच्युत गोडबोलेंच लिखाण त्यांच्या अनेकवर्षांच्या वाचनानं,त्यांच्या विविध क्षेत्रातील तज्ञांसोबत केलेल्या कामातून आलेल्या अनुभवानं समृद्ध असंच असतं. याही पुस्तकात त्यांनी आणि दीपा देशमुखांनी  बरीच मेहनत घेत हे चरित्र मांडताना अनेकविध पुस्तकांचा संदर्भ घेतलेला आहे त्यामुळं ते वाचताना कमी वेळात खूप जास्त ज्ञान मिळवल्याचं. समाधान मिळतं.लीझचं आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेलं होतं आणि तिला कायम ती करत असलेल्या कामाचं श्रेय देण्यापासून अव्हेरलं गेलं. तिच्या आयुष्यात आलेले असे कठीण प्रसंग पुस्तकात जागोजागी आढळतात आणि त्या प्रसंगांच्या उत्तम मांडणीमुळे ते लक्षातही राहतात. लीझ माइट्नर आपल्याला या पुस्तकातून एक खंबीर व्यक्तिमत्व म्हणून भेटते.

विज्ञानासारख्या तांत्रिक विषयात योगदान दिलेल्या एखाद्या व्यक्तीचं चरित्र कदाचित एखाद्या टेक्स्ट बुकसारखं झालं असतं पण विज्ञानामधील अणुरेणू, रेडिओऍक्टिव्हिटी, किरणोत्सर्ग आणि अणुगर्भविज्ञान यांसारख्या संकल्पनाही सोप्या भाषेत सांगून लीझचं काम किती अवघड आणि मोठं होतं किंवा आहे याची जाणीव लेखक जोडीने या पुस्तकातून आपल्याला करून दिलेली आहे. हे पुस्तक विज्ञानात रस असणाऱ्यांना तर नक्कीच आवडेल पण जे माझ्यासारखे आहेत ज्यांना विज्ञानाची अगदीच बेसिक माहिती आहे त्यांना हे पुस्तक विज्ञानावरची अशीच अनेक पुस्तकं हुडकून वाचायला लावेल यात शंका नाही!

समीक्षक – अभिषेक गोडबोले

genius world changing atomic science achyut godbole deepa deshmukh abhishek


ऑनलाईन पुस्तक खरेदी लिंक्स:





संबंधित व्हिडिओ


पोस्ट शेयर करा:

About the author

ईनसाईड मराठी बुक्स

View all posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *